पूरग्रस्तांसाठी युवकांचा मदतीचा हात;श्री कुलस्वामिनी विद्यालय बॅच 2007 तर्फे धडाकेबाज उपक्रम
पूरग्रस्तांसाठी युवकांचा मदतीचा हात;श्री कुलस्वामिनी विद्यालय बॅच 2007 तर्फे धडाकेबाज उपक्रम
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
धाराशिव जिल्ह्यातील अनेक भागात आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे शेतकरी व सामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा कठीण काळात सामाजिक बांधिलकी जपत श्री कुलस्वामिनी विद्यालय बॅच 2007, तुळजापूर तर्फे पूरग्रस्तांना दिलासा देणारे मदतकार्य राबविण्यात आले.

या मदत कार्यांतर्गत परांडा तालुक्यातील ढग पिंपरी, लाखी व भांडगाव या गावांमध्ये 120 ग्रोसरी कीट तसेच 200 ब्लँकेट व चादरींचे वाटप करण्यात आले. पूरग्रस्तांच्या चेहऱ्यावर हसू फुलविण्याचा हा उपक्रम ठरला.
मदत संकलन व वितरणाचे काम पूरग्रस्त मदत संकलन परिवार, महाराष्ट्र तसेच श्री कुलस्वामिनी विद्यालय बॅच 2007, तुळजापूर यांच्या माध्यमातून पार पडले. या कार्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविणाऱ्या सर्व दाते, मित्रपरिवार व स्वयंसेवकांचे आयोजकांनी मनःपूर्वक आभार मानले.
“सामाजिक कार्य हीच खरी पूजा” या ध्येयाने प्रेरित होऊन अशा प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन भविष्यातही करण्यात येईल, असा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे.



