Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

तुळजापूर नगराध्यक्षपद सर्वसाधारण पुरुष राखीव-राजकीय समीकरणात उलथापालथ,चुरस वाढणार!

इच्छुकांची तयारी,पक्षांतर्गत गणिते तापली; थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडणार

0 7 6 4 8 6

तुळजापूर नगराध्यक्षपद सर्वसाधारण पुरुष -राजकीय समीकरणात उलथापालथ,चुरस वाढणार!

इच्छुकांची तयारी,पक्षांतर्गत गणिते तापली; थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडणार

तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी

महाराष्ट्रातील नगरपालिकांच्या आगामी निवडणुकांची आरक्षण सोडत आज दि.५ ऑक्टोंबर रोजी जाहीर होताच तुळजापूरच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. या सोडतीनुसार तुळजापूर नगराध्यक्षपद सर्वसाधारण पुरुष गटासाठी राखीव ठरले आहे. यामुळे शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

थेट जनतेतून नगराध्यक्ष पदाची निवडणूक होणार असल्याने आता इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे. पक्षांतर्गत गटबाजी, आपापसातील मतभेद आणि नवे चेहरे या सर्वामुळे यंदाची लढत चुरशीची ठरणार हे निश्चित आहे.

◾प्रशासक राज संपणार,पण विकास प्रश्न कायम!

गेल्या साडेचार वर्षांपासून तुळजापूर नगरपालिकेवर प्रशासक राज सुरू आहे. शहरातील भुयारी गटार योजना अर्धवट,रस्ते खड्डेमय,आणि १८६५ कोटींच्या शहर विकास आराखडा काम रखडलेले आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये नाराजी असून, आगामी निवडणुकीत विकासाचा मुद्दा तापणार आहे.

◾राजकीय समीकरणे नव्याने जुळणार

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर तुळजापूरच्या राजकारणात मोठा उलथापालथ घडली होती. त्यांच्यासोबत अनेक नगरसेवक भाजपच्या छत्राखाली गेले. आता पुन्हा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा), शिंदे गटाची शिवसेना,भाजप,राष्ट्रवादीचे शरद पवार व अजित पवार गट, आणि काँग्रेस-या सर्व पक्षांचे गणित बदलले आहे.

◾महायुती विरुद्ध महाविकास आघाडी – लढत रंगणार!

पारंपरिकरीत्या शिवसेने चा तुळजापूरमध्ये मजबूत गड असला तरी गेल्या काही वर्षांत भाजपने संघटनशक्ती वाढवून तरुण मतदारांपर्यंत पोहोच साधली आहे. त्यामुळे यंदा शिवसेना विरुद्ध भाजप अशी थेट लढत रंगणार असल्याचे चित्र दिसते.

◾ मतदारांचे समीकरण निर्णायक

शहरातील मतदार वर्ग विकासाच्या मुद्यांवर निर्णय घेईल का,की जातीय समीकरणांचा प्रभाव दिसेल? हा प्रश्न सध्या सर्वांच्या चर्चेत आहे. सर्वसाधारण गटाला आरक्षण मिळाल्याने या समाजातील नेत्यांची हालचाल सुरू झाली असून, “कोण होणार तुळजापूरचा पुढचा पहिला नगराध्यक्ष ?” हा प्रश्न शहरवासीयांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

◾सर्वसाधारण पुरुष राखीव नगराध्यक्षपदावर तुफान राजकीय हालचाली;तुळजापूर मध्ये गंगणे, अमोल कुतवळ, आमनेसामने!

नगराध्यक्षपदाची सोडत सर्वसाधारण पुरुष ठरल्यानंतर स्थानिक राजकारणात नवी चुरस पेटली आहे. महायुतीकडून विनोद गंगणे आणि विजय गंगणे हे दावेदार म्हणून चर्चेत आले असून, महाविकास आघाडी कडून अमोल कुतवळ यांचे नाव आघाडीवर आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून श्रीकृष्ण सूर्यवंशी यांच्या सक्षम उमेदवाराची जोरदार चर्चा सुरू आहे. आरक्षण बदलामुळे अनेकांची समीकरणे बिघडली असून, आगामी निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

4.8/5 - (5 votes)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे