कळंब नगर परिषद मतदार यादीत‘सावळा गोंधळ’ शहरात नसलेले मतदार यादीत कसे? – माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा
कळंब नगर परिषद मतदार यादीत‘सावळा गोंधळ’ शहरात नसलेले मतदार यादीत कसे? - माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा
कळंब नगर परिषद मतदार यादीत‘सावळा गोंधळ’
शहरात नसलेले मतदार यादीत कसे? – माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा
कळंब : भिकाजी जाधव
कळंब नगरपरिषद निवडणुकीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने मार्गी लागत असतानाच रविवारी माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना (ठाकरे गट) चे शहर निवडणूक प्रभारी संजय मुंदडा यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रशासनाने जाहीर केलेल्या मतदार याद्यांतील गंभीर अनियमिततेचा मुद्दा उपस्थित केला.“जे शहरात राहतच नाहीत, त्यांची नावे मतदार यादीत कशी?”असा थेट सवाल मुंदडा यांनी प्रशासनाला विचारला.

८ ऑक्टोबर रोजी नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. मात्र, या याद्यांमध्ये झालेल्या बदलांमुळे मोठा ‘सावळा गोंधळ’ निर्माण झाल्याचा आरोप मुंदडा यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, “इतिहासात कधी नव्हे इतक्या प्रमाणात एका वॉर्डातील तब्बल दोनशे ते तीनशे मतदारांची नावे दुसऱ्याच वॉर्डात हलवण्यात आली आहेत. काही प्रकरणांमध्ये तर भौगोलिकदृष्ट्या दूर असलेल्या वॉर्डांत मतदारांची नावे आढळतात. हे बदल मतदानाची टक्केवारी कमी करण्यासाठी आणि मतदारांना गोंधळात टाकण्यासाठी जाणूनबुजून केले असल्याचा संशय आहे,” असे त्यांनी सांगितले.

मुंदडा म्हणाले, “हा प्रकार केवळ दोन वॉर्डांपुरता मर्यादित नसून, प्रभाग क्रमांक ३, १० आणि इतर ठिकाणीही आढळतो. यामुळे नागरिकांना स्वतःच्या प्रभागातील प्रतिनिधी निवडताना अडचणी येतील. प्रशासनाने असा गोंधळ का केला, याचे स्पष्टीकरण द्यावे.”
पत्रकार परिषदेत नंदकुमार हौसलमल व गोविंद चौधरी उपस्थित होते. मुंदडा पुढे म्हणाले, “एका विशिष्ट पक्षाच्या सहयोगी संघटनेशी हातमिळवणी करून यंत्रणेने दीड ते दोन हजार नावे यादीत समाविष्ट केली आहेत. हे मतदार कळंब शहरात राहतच नाहीत. मग त्यांची नावे मतदार यादीत कशाच्या आधारावर आली? कोणते पुरावे सादर केले गेले?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
शासनाने आक्षेप नोंदविण्याची प्रक्रिया सुरु ठेवली असली तरी प्रशासनाने स्वतःहून (सुवो-मोटो) या अनियमितता दूर करून यादीचे पुर्नप्रसिद्धीकरण करावे, अशी मागणीही मुंदडा यांनी केली.
यावर सर्वपक्षीय स्तरावर चर्चा होऊन मतदार याद्यांमधील त्रुटी तातडीने दूर झाल्या पाहिजेत, अन्यथा नागरिकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास ढळेल, असा इशाराही त्यांनी दिला.



