Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

जिल्ह्याच्या पुनर्वसनात एनजीओंचे योगदान अत्यावश्यक — जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एनजीओंची समन्वय बैठक

0 7 6 4 9 7

जिल्ह्याच्या पुनर्वसनात एनजीओंचे योगदान अत्यावश्यक — जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एनजीओंची समन्वय बैठक

धाराशिव जिल्ह्यात २१ सप्टेंबरच्या रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून शेती, सार्वजनिक तसेच खाजगी मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना झालेली आर्थिक हानी आणि मानसिक धक्का गंभीर स्वरूपाचा आहे. या संकटातून जिल्ह्याला पुन्हा सावरून विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी एनजीओंचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात दिनांक ३ ऑक्टोबर रोजी आयोजित पूरग्रस्त मदत समन्वय बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, उपजिल्हाधिकारी अरुणा गायकवाड, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे कार्यक्रम समन्वयक गणेश चादरे, डॉ संपत काळे, डॉ गजानन हिवाळे, श्री आनंद भालेराव श्री शंकर ठाकरे, ‘पर्याय’ संस्थेचे विश्वनाथ तोडकर, तसेच एस.एस.पी. संस्थेच्या सौ. नसीम शेख यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पुजार म्हणाले की, “पूरग्रस्तांच्या नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यात असून शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी मानसिक समुपदेशन व सहाय्याची तातडीची गरज आहे. यासाठी हेल्पलाइन सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. तसेच रब्बी हंगामासाठी आवश्यक मदत, रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतरस्ते व बांध दुरुस्तीची कामे आणि भूमिहीन शेतमजुरांना रोहयोतून रोजगार देण्याची कार्यवाही सुरू आहे.”

ते पुढे म्हणाले की, “सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते, पूल आणि इमारतींना २५० कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. भविष्यात अशा आपत्ती टाळण्यासाठी दीर्घकालीन आणि शाश्वत उपाययोजना आखल्या जाणार आहेत.”

जिल्हाधिकारी पुजार यांनी पुढे सांगितले की, “जिल्ह्यातील सुमारे १४० गावे पूरग्रस्त झाली आहेत. या गावांना एनजीओंनी दत्तक घेऊन आरोग्य, शिक्षण, कृषी, पायाभूत सुविधा, जलसंधारण, मृदा संवर्धन आणि दुग्धव्यवसाय अशा क्षेत्रांमध्ये काम करावे. कृषी उत्पादन वाढविणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे हे पुढील कार्याचे प्रमुख उद्दिष्ट असावे.”

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. घोष यांनी शाळा आणि अंगणवाड्यांच्या नुकसानीबाबत माहिती देत स्वच्छता, औषधसाठा, पशु चारा आणि स्वच्छ पाणीपुरवठा यावर विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. एनजीओंनी स्वच्छता अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले.

अपर जिल्हाधिकारी सौ. पाटील यांनी पीक नुकसानीचे पंचनामे ७५ टक्क्यांहून अधिक पूर्ण झाल्याचे सांगत एनजीओंच्या कार्याचे कौतुक केले आणि पुढील सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे गणेश चादरे यांनी पूरस्थितीत एनजीओंनी केलेल्या अन्नधान्य वितरण, निवारा, औषधोपचार, मानसिक आधार आणि स्थानिक समुदायाशी समन्वय या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. “एनजीओ आणि स्वयंसेवकांचे हे योगदान प्रशासनासाठी आदर्श आणि प्रेरणादायी ठरेल,” असे ते म्हणाले.

या बैठकीत ७० पेक्षा अधिक सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

याप्रसंगी डॉ संपत काळे म्हणाले की, पूरग्रस्त क्षेत्रांतील आपले कार्य सादर करत भविष्यातील मदत कार्यासाठी ठोस उपाय सुचवले. चर्चेमध्ये निवारा, अन्नधान्य, औषधोपचार, शैक्षणिक मदत, शेतकरी सहाय्य, पर्यावरण संवर्धन, मानसिक आरोग्य व समुपदेशन, तसेच शाश्वत विकासाच्या आराखड्यांवर सविस्तर विचारविनिमय झाला. तर डॉ गजानन हिवाळे यांनी सर्व्हेक्षण कामात एनजीओंनी सहकार्य करावे असे आवाहन केले.

भविष्य कालीन उपाय योजना कार्यात टिस तुळजापुर कॅम्पस कटिबध्द राहणार असल्याचे मत प्रो. बाळ राक्षसे कॅम्पस संचालक यांनी आपल्या संदेशातून सांगितले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आनंद भालेराव यांनी केले.

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे