आपसिंगा-काक्रंबा पाणीपुरवठा योजनेच्या चौकशी समितीवर ‘मॅनेज’चा आरोप;अमीर शेख यांची अधीक्षक अभियंता लातूर यांच्याकडे तक्रार
आपसिंगा-काक्रंबा पाणीपुरवठा योजनेच्या चौकशी समितीवर ‘मॅनेज’चा आरोप;अमीर शेख यांची अधीक्षक अभियंता लातूर यांच्याकडे तक्रार !

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या अपसिंगा-काक्रंबा संयुक्त पाणीपुरवठा योजनेत प्रचंड गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत असून, या संदर्भात यापूर्वीच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, धाराशिव कार्यालयाकडे तक्रारी दाखल झालेल्या आहेत. त्यानुसार अधीक्षक अभियंता, लातूर यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली होती.

या समितीत कार्यकारी अभियंता ए. एस. पाटील (लातूर), सहाय्यक चौकशी अधिकारी ए. एस. राघू आणि एम. एच. कुमटे या तिघांचा समावेश होता. दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोजी ही चौकशी समिती अपसिंगा येथे दाखल होऊन कामाची पाहणी करून परतली.

मात्र, आज 40 दिवस उलटूनही समितीने ट्रायल पीट घेतलेले नाही, तसेच सखोल पाहणीही केली नाही, अशी तक्रार अमीर शेख यांनी केली आहे. त्यांनी आज (28 ऑक्टोबर) अधीक्षक अभियंता लातूर यांची भेट घेऊन, “चौकशी समिती मॅनेज झाली असून, आमचा त्या समितीवरील विश्वास नाही” असा आरोप करत लेखी तक्रार सादर केली.

शेख यांनी अधीक्षक अभियंता यांना विनंती केली की, नेमलेल्या चौकशी समितीने अद्याप अहवाल न दिल्याचे कारण तपासावे आणि वरिष्ठांचे आदेश धाब्यावर बसवल्याबद्दल संबंधितांवर कारवाई करावी. तसेच नवीन विभागीय चौकशी समिती नेमण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली.

अमीर शेख यांनी इशारा दिला की, “आठ दिवसांत लेखी उत्तर मिळाले नाही, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल.”
या प्रकरणी अधीक्षक अभियंता लातूर यांनी सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती समोर आली आहे.




