ब्रेकिंगमहाराष्ट्र
तुळजापूरात भव्य ‘तपोरत्न भक्तनिवास’ साकारणार; भाविकांच्या सुविधेत मोठी भर पडणार
काशीपीठाचे जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन महास्वामी यांचे प्रतिपादन; भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न

0
7
6
4
8
6
तुळजापूरात भव्य ‘तपोरत्न भक्तनिवास’ साकारणार; भाविकांच्या सुविधेत मोठी भर पडणार
काशीपीठाचे जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन महास्वामी यांचे प्रतिपादन; भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न
तुळजापूर : श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी तुळजापूर येथील जंगम मठ परिसरात उभारण्यात येणारे भव्य ‘तपोरत्न भक्तनिवास’ हे भाविकांसाठी वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन काशीपीठाचे जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन महास्वामी यांनी केले. होटगी मठ संस्थानच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर पंढरपूर देवस्थान समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, आमदार विजयकुमार देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील, नगराध्यक्ष विनोद गंगणे, गुड्डापूर देवस्थान समितीचे सिद्धया स्वामी, ज्येष्ठ नेते आप्पासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती सिद्धेश्वर कोरे, सोलापूर जिल्हा परिषदेचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, माजी उपनगराध्यक्ष अमर मगर, गटनेते औदुंबर कदम, नगरसेवक रणजीत इंगळे, आनंद जगताप, राजाभाऊ मुंडे ट्रस्टचे गुरुनाथ बडूरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

गहिनीनाथ महाराज औसेकर, अर्चनाताई पाटील आणि विनोद गंगणे यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले. त्यानंतर कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी बोलताना जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन महास्वामी म्हणाले की, श्री तुळजाभवानी देवीचे महात्म्य संपूर्ण देशभर पसरले असून दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे आधुनिक सुविधांनी युक्त भक्तनिवास उभारल्यास भाविकांच्या निवास व्यवस्थेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार आहे.या प्रकल्पांतर्गत भक्तनिवासासोबतच महादेव मंदिर आणि भव्य सभामंडपही उभारण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, काशीपीठाच्या जगद्गुरूंच्या आशीर्वादाने सुरू झालेले हे कार्य निश्चितच पूर्णत्वास जाईल. या कामासाठी नगरपरिषद आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे सर्वतोपरी सहकार्य राहील. तसेच या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.काशी विश्वनाथ मंदिराकडून दरवर्षी श्री तुळजाभवानी मंदिरासाठी मानाचे महावस्त्र पाठविण्याची परंपरा सुरू व्हावी, यासाठी जगद्गुरू आणि नगरपालिकेने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.यावेळी गहिनीनाथ महाराज औसेकर आणि आमदार विजयकुमार देशमुख यांनीही मनोगत व्यक्त करत धार्मिक पर्यटनाच्या विकासासाठी अशा प्रकल्पांची आवश्यकता अधोरेखित केली.
कार्यक्रमास होटगी संस्थानचे सचिव शांतया स्वामी, संचालक शशिकांत रामपुरे, शिवानंद पाटील, संगप्पा महमाने, केदार उंबरजे, श्रीशैल अंबारे, विजय कंदले, मधुकर शेळके, आनंद कंदले, गुलचंद व्यवहारे, सागर कदम, अनंत कोंडो, ॲड. गिरीश शेटे, प्रफुल मस्के, महाबळेश्वर तोडकरी, भारत कोप्पा, लक्ष्मण उळेकर, महेश नडमने, अभिषेक कोरे, विश्वनाथ शेटे, अस्मिता शेटे, गौरीशंकर साखरे, राजकुमार बुट्टे यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक व नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमातील धार्मिक विधी परमेश्वर शास्त्री यांनी संपन्न केले. कार्यक्रमानंतर जगद्गुरूंनी पायी चालत श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यापूर्वी श्रीशैल पीठाचे जगद्गुरू डॉ. चन्नसिद्धाराम यांनीही जंगम मठास भेट देऊन देवीचे दर्शन घेतल्याने धार्मिक वातावरण अधिक भक्तिमय झाले.
0
7
6
4
8
6



