ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
जिल्हा परिषद निवडणूक जाहीर होण्याआधीच राजकीय हालचालींना वेग

0
7
6
4
9
7
जिल्हा परिषद निवडणूक जाहीर होण्याआधीच राजकीय हालचालींना वेग
तुळजापूर | प्रतिनिधी
जिल्हा परिषद निवडणुकीची अधिकृत घोषणा अद्याप झाली नसली तरी मंगरूळ गटात राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. निवडणूक आयोगाकडून कोणत्याही क्षणी कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात असून, सोमवारी आचारसंहिता लागू होऊ शकते, अशा चर्चांना जोर आला आहे. या पार्श्वभूमीवर नंदगाव, सिंदफळ, आपसिंगा,मंगरूळ गटात इच्छुक उमेदवार, पक्षाचे पदाधिकारी आणि समर्थक यांच्यात हालचालींना वेग आला आहे. विशेष म्हणजे तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनी यावेळी शहरातील ‘आयात’ उमेदवारांना स्पष्ट नकार दिल्याचे चित्र दिसत आहे. गावासाठी गावात राहून, तळागाळातील लोकांसोबत उभे राहून काम करणाऱ्यालाच संधी द्यावी,अशी ठाम भूमिका ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. मागील काही निवडणुकांत शहरातून आलेल्या उमेदवारांनी केवळ निवडणुकीपुरते दर्शन दिले, विकासकामे मात्र कागदावरच राहिली, अशी नाराजी ग्रामीण मतदारांमध्ये आहे. मंगरूळ, सिंदकळ,नंदगाव गटात सध्या विविध पक्षांकडून चाचपणी सुरू असून, संभाव्य उमेदवार गावोगावी बैठका, संपर्क दौरे आणि बैठकींच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करत आहेत. काही नेत्यांकडून सोशल मीडियावरूनही अप्रत्यक्ष प्रचार सुरू झाला आहे. मात्र आचारसंहिता लागू होताच या हालचालींवर निर्बंध येणार असल्याने इच्छुकांनी आपापली तयारी अंतिम टप्प्यात आणली आहे.ग्रामीण विकास, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य व शिक्षण या मुद्द्यांवर प्रत्यक्ष काम करणाऱ्या नेत्यांनाच यावेळी पसंती मिळणार, असे संकेत आहेत.फक्त आश्वासनं देणारे नव्हे, तर संकटात गावकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिलेले लोकच आमचे प्रतिनिधी असावेत, अशी भूमिका अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केली.दरम्यान, निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर होताच मंगरूळ, सिंदफळ, आपसिंगा ,नंदगाव गटातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार असून, स्थानिक विरुद्ध बाहेरील असा सामना रंगण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
0
7
6
4
9
7



