मोटारसायकल चोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात!
धाराशिव जिल्ह्यातील ४ चोरीच्या मोटारसायकलींसह दोघांना अटक
मोटारसायकल चोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात!
धाराशिव जिल्ह्यातील ४ चोरीच्या मोटारसायकलींसह दोघांना अटक
धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी
जिल्ह्यातील वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांवर धडक कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेने दोन चोरट्यांना जेरबंद करत त्यांच्या ताब्यातून तब्बल चार चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे आनंदनगर, तुळजापूर, येरमाळा आणि लातूर जिल्ह्यातील मुरुड पोलीस ठाणे हद्दीतील चार गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार यांचे पथक धाराशिव जिल्ह्यातील विविध चोरीच्या गुन्ह्यांच्या तपासासाठी रवाना झाले असता, कळंब येथे त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दोन इसम चोरीच्या मोटारसायकली विक्रीस काढत आहेत. तात्काळ पथकाने सापळा रचून संबंधित इसमांना ताब्यात घेतले.
सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर, पोलिसांच्या चौकशीत त्यांनी अखेर गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या ताब्यातून एकूण चार मोटारसायकली (किंमत १,५५,०००) जप्त करण्यात आल्या.
ताब्यात घेतलेले आरोपी असे आहेत
1️⃣ अर्जुन साहेबराव काळे (वय २९, रा. वाकडी पारधी पिढी, ता. कळंब, जि. धाराशिव)
2️⃣ नितीन विश्वास शिंदे (वय २५, रा. नांदूर, ता. केज, जि. बीड, ह.मु. मांडवा, ता. वाशी, जि. धाराशिव)
दोघांकडून चोरीच्या चार मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या असून पोलिस त्यांचे अन्य साथीदारांचा शोध घेत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार तसेच पोहेका शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण, रत्नदीप डोंगरे व नागनाथ गुरव यांच्या पथकाने केली.स्थानिक गुन्हे शाखेच्या दक्ष तपासामुळे धाराशिव जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीच्या मालिकेवर मोठा लगाम बसला आहे.



