ब्रेकिंगमहाराष्ट्र
घरकुलाचे स्वप्न चक्काचूर; निकृष्ट बांधकामामुळे आवास योजनेतील घर कोसळले
वृद्ध जखमी; गुत्तेदारावर गंभीर आरोप, चौकशीची मागणी

0
7
6
4
9
6
घरकुलाचे स्वप्न चक्काचूर; निकृष्ट बांधकामामुळे आवास योजनेतील घर कोसळले
वृद्ध जखमी; गुत्तेदारावर गंभीर आरोप, चौकशीची मागणी
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलाचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होण्यापूर्वीच उद्ध्वस्त झाल्याची धक्कादायक घटना तुळजापूर तालुक्यातील काटी तांडा येथे घडली आहे. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे रेडीमेड घराचा काही भाग कोसळून लाभार्थ्यांच्या वृद्ध वडिलांना दुखापत झाली. या घटनेमुळे सरकारी योजनांच्या गुणवत्तेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित गुत्तेदारावर कारवाईची मागणी होत आहे.काटी तांडा येथील संजय जाधव यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले होते. या योजनेतून उभारण्यात आलेल्या रेडीमेड घराचे काम संबंधित गुत्तेदारामार्फत करण्यात आले होते. मात्र, बांधकामाच्या दर्जाबाबत सुरुवातीपासूनच शंका व्यक्त करण्यात येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.शुक्रवारी (दि. ५) दुपारी अचानक घराचा काही भाग कोसळला. त्यावेळी घरात संजय जाधव यांचे वृद्ध वडील, पत्नी, मुलगा आणि ११ वर्षीय मुलगी उपस्थित होते. घर कोसळत असल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी बाहेर धाव घेतली. मात्र, वृद्ध वडिलांना वेळेत बाहेर पडता न आल्याने ते ढिगाऱ्याखाली अडकून जखमी झाले. त्यांना तत्काळ तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.लाभार्थी संजय जाधव यांनी संबंधित गुत्तेदारावर गंभीर आरोप केले आहेत. घर उभारताना सिमेंटचे पोल आवश्यक खोलीपर्यंत जमिनीत रोवण्यात आले नसून बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे. तसेच काम वेळेत पूर्ण करण्यात आले नसल्याचेही त्यांनी सांगितले. या निष्काळजीपणामुळेच घर कोसळल्याचा आरोप त्यांनी केला आहे.या दुर्घटनेत घराचे मोठे नुकसान झाले असून परिसरातील आंब्याच्या झाडालाही फटका बसला आहे. घरकुलासाठी शासनाच्या योजनेवर विसंबून राहिलेल्या कुटुंबासमोर पुन्हा निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे लाभार्थी कुटुंब आर्थिक व मानसिक संकटात सापडले आहे.दरम्यान, या प्रकरणात गावचे सरपंच, पंचायत समितीचे सभापती तसेच भाजपचे तालुकाध्यक्ष यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. मात्र, संबंधित गुत्तेदार कोणाचेही ऐकून घेण्यास तयार नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.याप्रकरणी तक्रार नोंदविण्यासाठी तामलवाडी पोलीस ठाण्यात गेल्यानंतर तक्रार स्वीकारण्यास टाळाटाळ झाल्याचा आरोप लाभार्थी कुटुंबाने केला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून दोषी गुत्तेदारावर कठोर कारवाई करावी, तसेच नुकसानग्रस्त कुटुंबाला तातडीने नवीन घर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. या संदर्भात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी वैयक्तिक लक्ष घालून न्याय द्यावा, अशी अपेक्षाही लाभार्थी कुटुंबाने व्यक्त केली आहे.प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उभारण्यात आलेले घरच कोसळल्याने परिसरात संताप व्यक्त होत असून, दोषींवर कारवाई होणार की प्रकरण दडपले जाणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
“निकृष्ट कामामुळे घर कोसळले”
“घर उभारताना दर्जेदार साहित्य वापरण्यात आले नाही. सिमेंटचे पोल योग्य प्रकारे बसवले नसल्यामुळे घराचा भाग कोसळला. आमचे मोठे नुकसान झाले असून जबाबदारांवर कारवाई व्हावी.”
— संजय जाधव, लाभार्थी
“चौकशी करून न्याय द्यावा”
“शासकीय योजनेतील घरकुल कोसळणे ही गंभीर बाब आहे. संबंधित कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई तसेच नुकसानग्रस्त कुटुंबाला तातडीची मदत देणे आवश्यक आहे.”
— स्थानिक ग्रामस्थ

0
7
6
4
9
6





