ब्रेकिंगमहाराष्ट्र
श्री तुळजाभवानी प्रक्षाळ ट्रस्टची शाकंभरी जलयात्रा नेत्रदीपक; २१ वर्षांची उज्ज्वल परंपरा कायम

0
7
6
4
8
6
श्री तुळजाभवानी प्रक्षाळ ट्रस्टची शाकंभरी जलयात्रा नेत्रदीपक; २१ वर्षांची उज्ज्वल परंपरा कायम
तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या पावन नगरीत श्री तुळजाभवानी प्रक्षाळ चॅरिटेबल ट्रस्ट, तुळजापूर यांच्या वतीने रूढी-परंपरेनुसार प्रतिवर्षाप्रमाणे शाकंभरी नवरात्र महोत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा होत आहे. या महोत्सवातील मुख्य आकर्षण असलेली भव्य-दिव्य पारंपारिक जलयात्रा शनिवार दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ठीक ६ वाजता पापनाशतीर्थ येथून विधीवतरीत्या निघणार आहे. या जलयात्रा उत्सवासाठी प्रक्षाळ ट्रस्टने परंपरेनुसार सविस्तर कार्यक्रमाची रूपरेषा आखली असून, जलयात्रेतील रथावर विराजमान असलेली शाकंभरी देवीची प्रतिमा संपूर्ण भाजीपाला (शाक) व फळांनी सुशोभित करण्यात येते. जलयात्रेत सहभागी होणाऱ्या सुवासिनी, कुमारिका व आराधनींना ५००१ कलशांचे (जलकुंभ) वाटप केले जाणार असून, २१०० साड्यांचे वितरण देखील करण्यात येणार आहे.या भक्तिमय जलयात्रेमध्ये दिंड्या, पताका, गोंधळी, आराधी, वारूवाले, धनगरी ढोल यांच्यासह प्रतिष्ठित पारंपारिक बँड, बॅन्जो पथक व तुतारीचा सवाद्य सहभाग असतो. तसेच शोभायात्रेचे विशेष आकर्षण म्हणून अश्व (घोडे), उंट, बैलगाडी यांचा समावेश दरवर्षी केला जातो. यंदाही उत्सवात अद्ययावत वाद्यांसह नवनवीन हलते- देखावे सादर करण्यात येणार आहेत.शाकंभरी मातेच्या जलयात्रेनिमित्त सहभागी होणाऱ्या प्रत्येक भाविकासाठी महाअन्नदानाची भव्य व्यवस्था करण्यात आली आहे. गेली अनेक वर्षे ट्रस्ट स्वखर्चाने ही सेवा अखंडपणे करत असून, अन्नदानाची तयारी दोन दिवस आधीच सुरू होते. यामध्ये ११०० किलो तांदळापासून व्हेज पुलाव, ८०० किलोहून अधिक गव्हाच्या पिठाच्या चपात्या, २१००० बालुशाही, खारीबुंदी, शेवग्याचे वरण, पालकभाजी आदी पदार्थ तयार केले जातात. तसेच २१००० भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था केली जाते. शेकडो महिला-पुरुष स्वयंसेवक या सेवेत सहभागी होतात.श्री तुळजाभवानी प्रक्षाळ चॅरिटेबल ट्रस्टच्या सर्व सभासदांसाठी दरवर्षी ड्रेस कोडची व्यवस्था करण्यात येते. माननीय गुरुवर्य महंत तुकोजी बुवा गुरु बजाजी बुवा व महंत वाकोजी बुवा गुरु तुकोजी बुवा यांच्या आशीर्वाद व मार्गदर्शनाखाली ट्रस्टकडून दररोज प्रक्षालन सेवा, चरणतीर्थ सेवा तसेच शारदीय नवरात्र महोत्सवात भाविकांसाठी उपवास खिचडी व फळे वाटप ही सेवा नियमितपणे सुरू आहे.
याशिवाय, श्री तुळजाभवानी मंदिरातील दैनंदिन पूजेमध्ये वाजविला जाणारा भव्य नगारा पूर्वापार परंपरेनुसार स्वखर्चाने शहरातून पारंपारिक मिरवणुकीने देवीचरणी अर्पण करण्यात येतो. असे अनेक धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम ट्रस्ट गेल्या २१ वर्षांपासून श्रद्धा, सेवा आणि परंपरेच्या त्रिसूत्रीवर सातत्याने राबवत आहे.भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या नेत्रदीपक व भक्तिभावपूर्ण शाकंभरी जलयात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री तुळजाभवानी प्रक्षाळ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

0
7
6
4
8
6



