ब्रेकिंगमहाराष्ट्र
शहर स्वच्छ न केल्यास थेट नगराध्यक्षांच्या टेबलावर कचरा!तुळजापूर नगरपरिषदेत विरोधकांचा इशारा; आठ दिवसांची मुदत
मुख्याधिकारी–नगराध्यक्षांना इशारा, अन्यथा थेट टेबलावर कचरा

0
6
7
8
4
1
शहर स्वच्छ न केल्यास थेट नगराध्यक्षांच्या टेबलावर कचरा!तुळजापूर नगरपरिषदेत विरोधकांचा इशारा; आठ दिवसांची मुदत
मुख्याधिकारी–नगराध्यक्षांना इशारा, अन्यथा थेट टेबलावर कचरा
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसून येत असून, नगरपरिषद प्रशासन आणि ठेकेदारांच्या ढिसाळ कारभाराविरोधात आता विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. शहरातील स्वच्छता आठ दिवसांत सुधारली नाही, तर थेट मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांच्या टेबलावर कचरा टाकून आंदोलन छेडले जाईल, असा इशारा विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी दिला आहे.२८ रोजी झालेल्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेस गटनेते अमोल कुतवळ, नगरसेवक रणजीत इंगळे, आनंद जगताप, अक्षय परमेश्वर व किरण कदम यांनी प्रशासनावर जोरदार तोफ डागली.यावेळी बोलताना अमोल कुतवळ म्हणाले की, सर्वसाधारण सभेसाठी मुख्याधिकाऱ्यांकडे वेळेत टिप्पणी मागितली होती. मात्र, प्रशासनाने त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले. नगरपरिषद निवडणुकीचा निकाल लागून तब्बल ४२ दिवस उलटून गेले, तरी प्रभाग क्रमांक ८, ९, ७ आणि १० मध्ये एकदाही गटारींची सफाई झालेली नाही. विरोधी पक्षाचे नगरसेवक निवडून आल्यामुळेच ही जाणीवपूर्वक दुर्लक्षाची वागणूक दिली जात आहे का?असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.या सर्वसाधारण सभेत तब्बल ८७ विषयांना मंजुरी देण्यात आली असली, तरी त्यातील अनेक विषयांवर विरोधकांनी तीव्र आक्षेप नोंदवले. त्यामुळे नूतन नगरपरिषदेची पहिलीच सर्वसाधारण सभा चांगलीच वादळी ठरल्याचे चित्र आहे.दरम्यान, शहराच्या स्वच्छतेसाठी नेमलेल्या ठेकेदार कंपनीवर “जावई लाड” होत असल्याचा आरोपही नगरसेवकांनी केला. शहरात कचऱ्याचे ढीग, तुंबलेल्या गटाऱ्या आणि दुर्गंधीने नागरिक हैराण झाले आहेत. तरीही प्रशासन आणि ठेकेदाराला काहीही पडलेले नाही,असा घणाघात त्यांनी केला.स्वच्छतेसाठी ५५ कर्मचारी अपुरे!
तीर्थक्षेत्र तुळजापूरची लोकसंख्या सुमारे ४६ हजार असून, दररोज येणाऱ्या भाविकांची संख्या जवळपास ५० हजारांच्या आसपास असते. असे असताना संपूर्ण शहराच्या स्वच्छतेसाठी केवळ ५५ कर्मचारी असल्याचे वास्तव समोर आले आहे.एवढ्या मोठ्या शहराची स्वच्छता ५५ कर्मचारी कशी करणार? ही तर नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळण्यासारखी बाब आहे,असा आरोप करत कर्मचाऱ्यांची संख्या तातडीने वाढवण्याची मागणी विरोधी नगरसेवकांनी केली आहे.आता प्रशासन आठ दिवसांत जागे होणार की विरोधकांचा इशारा प्रत्यक्षात उतरणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

0
6
7
8
4
1



