धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचे आणखी एक मोठे यश!
राष्ट्रीय महामार्गावर जॅक टाकून लूटमार करणाऱ्या अंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश — दोन आरोपी ताब्यात!
धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचे आणखी एक मोठे यश!

राष्ट्रीय महामार्गावर जॅक टाकून लूटमार करणाऱ्या अंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश — दोन आरोपी ताब्यात!
धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या दक्षतेमुळे पुन्हा एकदा गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे. राष्ट्रीय महामार्गावर प्रवाश्यांच्या गाड्या जॅक टाकून थांबवून दरोडा टाकणाऱ्या एका अंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री लुटमारीच्या घटनांनी जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विशेषतः दि. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी उमरग्याकडून सोलापूरच्या दिशेने प्रवास करणाऱ्या डॉक्टरच्या कुटुंबावर झालेल्या दरोड्याने पोलिस यंत्रणेला हादरवून सोडले होते. या घटनेबाबत डॉ. अब्दुल गफूर अब्दुल रऊफ जनैदी यांच्या फिर्यादीवरून मुरुम पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३०९/२०२५ भादंवि कलम ३१०(२), ३११ अन्वये नोंद करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य ओळखून मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रीतु खोखर यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विनोद ईज्जपवार यांना तपासाची जबाबदारी दिली. त्यांनी आपल्या पथकासह तांत्रिक माहितीचा आणि पारंपरिक तपास पद्धतींचा वापर करून आरोपींचा शोध सुरु केला आणि अखेर आज (दि. १ नोव्हेंबर) या टोळीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले.
या कारवाईत अर्जुन बालाजी शिंदे आणि आशोक हिरामन शिंदे या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांनी चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपींनी मुरुम हद्दीतील दरोड्याबरोबरच जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव परिसरातही अशाच प्रकारे महामार्गावर ट्रक आणि गाड्यांना अडवून लूट केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.या टोळीच्या ताब्यातून XUV500 गाडी, ट्रक आणि जॅक जप्त करण्यात आले आहेत.
सदरील कारवाई मा. श्रीमती रीतु खोखर (पोलीस अधीक्षक, धाराशिव) यांच्या मार्गदर्शनाखाली
श्री. विनोद ईज्जपवार (पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा) यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
या यशस्वी मोहिमेत स.पो.नि. सुदर्शन कासार, पो.अं. शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण, शोभा बांगर (महिला पो.अं.), राठोड, तसेच चालक सुभाष चौरे, प्रकाश बोईनवाड, रत्नदीप डोंगरे, नागनाथ गुरव यांनी मोलाची भूमिका बजावली.या संपूर्ण कारवाईत QRT आणि RCP पथकांचे योगदान विशेष उल्लेखनीय राहिले आहे.
धाराशिव पोलीस दलाच्या या धाडसी कारवाईमुळे महामार्गावरील प्रवाशांचा आत्मविश्वास परत मिळाला असून या कामगिरीचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.



