ब्रेकिंगमहाराष्ट्र
नंदगाव पोलीस पाटील निलंबन प्रकरणाला नवे वळण; “तो जबाब माझा नाहीच”- साक्षीदाराचा नोटरीद्वारे धक्कादायक खुलासा बनावट स्वाक्षऱ्यांचा संशय ?
पोलीस पाटील संघटनेचा फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा !

0
6
7
8
4
1
नंदगाव पोलीस पाटील निलंबन प्रकरणाला नवे वळण; “तो जबाब माझा नाहीच”- साक्षीदाराचा नोटरीद्वारे धक्कादायक खुलासा बनावट स्वाक्षऱ्यांचा संशय ?
पोलीस पाटील संघटनेचा फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा !
तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथील पोलीस पाटील किरणकुमार भाले यांच्या निलंबन प्रकरणाला आता नवे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. या प्रकरणात पोलिसांकडून नोंदविण्यात आलेल्या जबाबांपैकी एका मुख्य साक्षीदाराने नोटरीद्वारे प्रतिज्ञापत्र सादर करत, “मी पोलिसांना कोणताही जबाब दिलेला नाही आणि त्या जबाबावर असलेली स्वाक्षरी माझी नाही,” असा स्पष्ट खुलासा केला आहे. या घडामोडीमुळे संपूर्ण चौकशी प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.नळदुर्ग पोलिसांनी या प्रकरणात एकूण १२ जणांचे जबाब नोंदविल्याचे दाखवले होते. मात्र, त्यापैकी एका साक्षीदारानेच जबाब नाकारल्याने उर्वरित ११ जबाबांच्या सत्यतेवरही संशय व्यक्त केला जात आहे. तक्रारदाराने राजकीय आकस आणि वैयक्तिक स्वार्थातून पोलीस प्रशासनाची दिशाभूल करून, साक्षीदारांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून हा चौकशी अहवाल तयार करून घेतल्याचा आरोप आता पुढे येत आहे.दरम्यान, ग्रामपंचायतीकडून देण्यात आलेल्या ठरावाबाबतही संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. माहिती अधिकारांतर्गत मागविण्यात आलेले बैठकीचे इतिवृत्त तसेच आवक-जावक नोंदी उपलब्ध करून देण्यास ग्रामसेवकाने टाळाटाळ केल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात खोट्या तक्रारी व बनावट पुराव्यांचा आधार घेऊन एका प्रामाणिक लोकसेवकाला पदावरून दूर करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप होत आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत न्यु महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेने संताप व्यक्त केला आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब कोळेकर – पाटील यांनी बनावट स्वाक्षऱ्यांच्या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.दरम्यान, या धक्कादायक खुलाशामुळे नंदगाव पोलीस पाटील निलंबन प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

0
6
7
8
4
1



