आपसिंगा ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार; पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प!
आपसिंगा ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार; पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प!
आपसिंगा ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार; पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प!
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा गावात गेल्या पंधरा दिवसांपासून काही भागात पाणीपुरवठा ठप्प असून ग्रामस्थांच्या संतापाला आता ऊत आला आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्रामपंचायतीने कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने नागरिकांच्या सहनशीलतेचा बांध तुटू लागला आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात असली तरी प्रत्यक्षात टंचाईग्रस्त भागातील नळ कोरडेच आहेत. अनेक घरांमध्ये महिला आणि वृद्ध नागरिकांना दोन-दोन किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. यामुळे ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनात मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

गावातील काही भागात नको तिथे रात्री भर पाणी वाहत असल्याचे दिसून येते, तर दुसरीकडे गरजूवंत भाग पाण्यावाचून तहानलेला आहे. “असे दुजाभावाचे नियोजन का?” असा सवाल नागरिक करत आहेत. पाण्याचे नियोजन नीट न झाल्याने आणि नियंत्रण नसल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असून, याची जबाबदारी घेणारा मात्र कोणी नाही.
ग्रामपंचायतीतील कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता ते धातूर-मातूर उत्तरे देऊन जबाबदारी झटकत आहेत. कुणी मोटर बंद पडल्याचे सांगते, तर कुणी लाईन लिकेजचे कारण पुढे करते. मात्र, एवढ्या काळात दुरुस्तीचे काम न होणे हे ग्रामपंचायतीच्या अक्षम्य दुर्लक्षाचे द्योतक असल्याची ग्रामस्थांची टीका आहे.
आपसिंगातील नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत तात्काळ पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिलाजात आहे. गावातील परिस्थिती लक्षात घेता, संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करून पाणीपुरवठा नियमित करावा,अशी मागणी सर्वत्र होत आहे. ग्रामस्थांचा प्रश्न सरळ आहे — आहे ती योजना नीट राबवता येत नाही, तर नवीन योजना कोण आणणार ? आपसिंगा ग्रामपंचायतीचा हा भोंगळ कारभार आता ग्रामस्थांच्या सहनशीलतेच्या पलीकडे गेला आहे.

पाईपलाईन लिकेजमुळे पाणीपुरवठा विस्कळीत
गेल्या काही दिवसांपासून पाईपलाईन लिकेजमुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. आज हा तांत्रिक दोष पूर्णपणे दुरुस्त करण्यात आला असून उद्यापासून नागरिकांना नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल. ग्रामपंचायत नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे.
उपसरपंच राहुल साठे, ग्रामपंचाय कार्यालय,आपसिंगा ता. तुळजापूर.जि.धाराशिव.




