ब्रेकिंगमहाराष्ट्र
सोलापुरात हिंदू राष्ट्र-जागृती सभा; हजारोंचा ‘श्रीराम राज्यासाठी’ कटीबद्धतेचा निर्धार
सोलापुरात हिंदू राष्ट्र-जागृती सभा; हजारोंचा ‘श्रीराम राज्यासाठी’ कटीबद्धतेचा निर्धार

0
7
6
5
1
2
सोलापूर, दि. ११ : धर्मरक्षणासाठी हिंदूंनी कृती करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) मनोजकुमार सिन्हा यांनी केले. सोलापूर येथील जयभवानी प्रशालेच्या मैदानावर आयोजित हिंदू राष्ट्र-जागृती सभेत ते बोलत होते. या सभेला हजारो हिंदू उपस्थित राहून श्रीराम राज्य स्थापनेसाठी कटीबद्ध होण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.सभेच्या प्रारंभी शंखनादानंतर सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. सभेचे सूत्रसंचालन चैतन्य तागडे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता सामूहिक ‘वंदे मातरम्’ने करण्यात आली.लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) मनोजकुमार सिन्हा म्हणाले, “अधर्माचा प्रतिकार हेच मोक्षाचे माध्यम आहे. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेले हेच मार्गदर्शन आजही हिंदूंना लागू होते. इतिहास नेहमी शक्ती आणि पराक्रम लक्षात ठेवतो. धर्माच्या रक्षणासाठी लढणे हे सर्वश्रेष्ठ कार्य असून धर्मयुद्धासाठी पराक्रम आणि शक्ती आवश्यक आहे.”हिंदू जनजागृती समितीचे सोलापूर जिल्हा समन्वयक राजन बुणगे यांनीही सभेला संबोधित करताना हिंदूंनी संघटित होऊन हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी अविरत कार्य करण्याचे आवाहन केले. “आज भारतासह अनेक देशांत हिंदूंवर विविध मार्गांनी आक्रमणे होत आहेत. त्यामुळे हिंदूंनी सतर्क राहून आपल्या धर्मबांधवांना साहाय्य करण्यासाठी पुढे यावे,” असे ते म्हणाले.

सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांनी जागतिक परिस्थितीचा संदर्भ देत धर्मरक्षणासाठी सिद्ध होण्याचे आवाहन केले. “जगभरात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत आहे. अशा काळात साधनेचे बळ आणि धर्मनिष्ठा यांचीच आवश्यकता भासणार आहे. स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी धर्मरक्षणासाठी सज्ज व्हावे,” असे त्यांनी सांगितले.

या सभेत हिंदूंनी विविध प्रसंगांमध्ये स्वरक्षण कसे करावे याची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. तसेच हिंदू जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा अलका व्हनमारे यांनी मांडला.सभेला संत पू. नागभूषणम् बिर्रु महाराज, राष्ट्रीय कथाकार महेशानंद महाराज, इंचगिरी मठाधीश ह.भ.प. पुष्पलता पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

लोकप्रतिनिधींमध्ये भाजप नगरसेवक सत्यनारायण गुर्रम, नगरसेवक बिज्जू प्रधाने, नगरसेविका उज्वला दासरी, चैताली गायकवाड, सुनिता कामाठी, माजी महापौर कांचना यन्नम, भाजप शहरप्रमुख रोहिणी तडवळकर तसेच ‘पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघम’चे अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश राजेश कोठे यांची उपस्थिती होती.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘घरच्या घरी करता येतील असे होमिओपॅथी उपचार’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. हिंदुत्वाच्या कार्यासाठी विशेष योगदान देणाऱ्या धर्मवीरांचा सत्कारही करण्यात आला. सभेला सोलापूर शहरासह परिसरातील ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने हिंदू उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम्’, ‘हिंदू राष्ट्राचा विजय असो’ आणि ‘जय श्रीराम’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमला.

0
7
6
5
1
2



