Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळ शिगेला विकासाच्या घोषणा जोरात; आश्वासनांचा पाऊस, प्रत्यक्ष कामाला मात्र दुष्काळ

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळ शिगेला विकासाच्या घोषणा जोरात; आश्वासनांचा पाऊस, प्रत्यक्ष कामाला मात्र दुष्काळ

0 7 6 4 8 6

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळ शिगेला विकासाच्या घोषणा जोरात; आश्वासनांचा पाऊस, प्रत्यक्ष कामाला मात्र दुष्काळ

धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी

धाराशिव तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळ चांगलीच तापली असून राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार विकासाच्या नावाखाली एकमेकांवर तुटून पडले असून मतदारांना भुलवण्यासाठी आश्वासनांची सरबत्ती सुरू आहे. मात्र या गगनभेदी घोषणांमधून प्रत्यक्ष कामाचा ठोस आराखडा कुठेच दिसत नसल्याने मतदारराजा साशंक नजरेने सर्व घडामोडी पाहत आहे.यापूर्वी सत्तेत असलेल्या पक्षांनी केलेल्या तथाकथित विकासाचा लेखाजोखा, भविष्यातील कामांची लांबलचक यादी आणि नव्याने मैदानात उतरलेले उमेदवार -या साऱ्यांच्या गप्पांमुळे विकासाचा मुद्दा पुन्हा एकदा केवळ भाषणांपुरताच मर्यादित राहिल्याची तीव्र चर्चा जनतेत रंगू लागली आहे. विशेषतः युवक मतदारांमध्ये “हे आश्वासन निवडणुकीपुरतेच असते” अशी नाराजी उघडपणे व्यक्त होत आहे.

▪️ ९ वर्षांपूर्वीची आश्वासने कुठे गायब ?

मागील निवडणुकीत दिलेली आश्वासने नेमकी कुठे गेली, हा प्रश्न यंदा पुन्हा ऐरणीवर आला आहे. चतुर मतदार मतदानासाठी सज्ज असला, तरी खरा विकास कधी होणार आणि तो कोण करणार? हा सवाल आजही अनुत्तरितच आहे. स्वातंत्र्यानंतर अनेक दशके उलटून गेली, तरी प्रत्येक निवडणुकीत तेच तेच प्रश्न, तीच भाषणे आणि तीच आश्वासने ऐकावी लागतात, याबाबत जनतेत तीव्र असंतोष आहे.

▪️सामान्य नागरिकांच्या नजरेत विकास म्हणजे काय ?

उमेदवारांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्या, तरी सामान्य नागरिकांच्या दृष्टीने विकास म्हणजे रस्ते, नाल्या, वीज, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि मूलभूत सुविधा. दुर्दैवाने आजही अनेक गावांत या सुविधा अपुऱ्याच असल्याचे वास्तव आहे. अंतर्गत राजकीय वादाचा फटका थेट सर्वसामान्य मतदारांवर बसत असल्याची भावना उघडपणे व्यक्त होत आहे.

▪️वडगाव गटात ‘मिनी मंत्रालय’साठी थेट लढत

वडगाव जिल्हा परिषद व पंचायत समिती म्हणजेच ‘मिनी मंत्रालय’ काबीज करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी आमनेसामने ठाकल्या आहेत. जोरदार प्रचार, खोटी आश्वासने आणि आरोपांची राळ उडत असतानाच मतदारांपर्यंत थेट पोहोचण्यात उमेदवार अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे.या मतदारसंघात शेकापूर, पोहणेर, देवळाली, वडगाव (सिं), धारूर, उत्तमी कायापूर, बावी, कावलदरा, पळसवाडी, बेगडा, सुर्डी, पिंपरी, झरेगाव, चिलवडी, वलगुड, जुनवणी, वरवंटी, गावसुद आदी गावांचा समावेश असून सुमारे २० ते २५ हजार मतदार आहेत. मात्र बहुतांश उमेदवार केवळ गावातील पुढाऱ्यांनाच भेटून चौकात फेरी मारत पुढे निघून जात असल्याचे वास्तव समोर येत आहे.अखेरीस, यंदाची जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक केवळ घोषणांची नव्हे, तर खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या उमेदवाराची कसोटी ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे.विकासाच्या हिऱ्यांची खरी पारख मतदारराजाच करणार, हे मात्र निश्चित.

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे