ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
तुळजापूरला अस्वच्छ राजकारण नको; महंतांची निवडणुकीतून जाहीर माघार ! तुळजापूरच्या पवित्र प्रतिमेचे रक्षण करा; महंतांचा नागरिकांना संदेश !
तुळजापूरच्या पवित्र प्रतिमेचे रक्षण करा; महंतांचा नागरिकांना संदेश !
0
6
7
8
4
1
तुळजापूरला अस्वच्छ राजकारण नको; महंतांची निवडणुकीतून जाहीर माघार !

तुळजापूरच्या पवित्र प्रतिमेचे रक्षण करा; महंतांचा नागरिकांना संदेश !
तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी
श्री क्षेत्र तुळजापूरातील सोमवार गिरी मठाचे मठाधिपती महंत ईच्छागिरी महाराज, महंत योगी मावेजीनाथ महाराज व महंत व्यंकट अरण्य महाराज यांनी तुळजापूर नगरपालिका निवडणूक 2025 संदर्भात दिलेले जाहीर स्पष्टीकरण प्रसिद्धीपत्रकाद्वारे समोर आले आहे. गेल्या दोन वर्षांत तुळजापूरची ओळख धार्मिक, सांस्कृतिक परंपरेपेक्षा अराजकता, गैरव्यवहार व भ्रष्टाचारामुळे कलंकित होत असल्याची खंत व्यक्त करत त्यांनी या निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा निर्णय कसा व का घ्यावा लागला, याची सविस्तर माहिती दिली.
महंतांनी स्पष्ट केले की श्री क्षेत्राची पारंपरिक ओळख ही शक्तीपीठ, अध्यात्म, परंपरा व मर्यादा यांची असल्याने तुळजापूरची प्रतिमा दूषित होऊ देणे योग्य नव्हते. शहरातील अनेक मान्यवर, नागरिक, विविध पक्षांचे नेते व प्रतिष्ठित व्यक्ती यांच्यासोबत चर्चा करताना एकच मागणी समोर आली— तुळजापूरमध्ये पैशाच्या जोरावर राजकारण होऊ नये. अर्थकारणातून सत्तेचा खेळ आणि सत्तेतून पुन्हा अर्थकारण सुरू झाल्यास शहराचा विकास खुंटतो, यावर सर्वांचे एकमत झाले.
याच कारणामुळे सर्वपक्षीय नेते आणि उमेदवारांमध्ये बिनविरोध नगराध्यक्ष करण्याचे प्रयत्नही झाले; परंतु काही कारणांमुळे तो प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही, असे महंतांनी नमूद केले.
महंत ईच्छागिरी महाराज यांच्या उमेदवारीबाबतचे स्पष्टीकरण
महंतांनी भारतीय जनता पक्षाकडून तसेच अपक्ष अशा दोन उमेदवारी अर्ज दाखल केले होते. भाजपाची अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने पक्षाचा अर्ज बाद झाला; मात्र अपक्ष अर्ज कायम राहिला. तो अर्ज मागे घेण्यासाठी गेले असता वेळेअभावी प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही.
मात्र त्यांनी स्पष्टपणे सांगितले—
“मी या निवडणूक लढतीचा भाग नाही.”
तुळजापूरकरांना संदेश
निवडणूक ही केवळ एक बटण दाबण्याची क्रिया नसून पुढील पाच वर्षांचे भविष्य ठरवणारा निर्णय असल्याचे सांगत महंतांनी नागरिकांना 100% मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
शहरातील सर्व ज्येष्ठ, मान्यवर, विविध पक्षांचे पदाधिकारी व नागरिकांनी संपूर्ण प्रक्रियेत सहकार्य केल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
हे स्पष्टीकरण महंत योगी मावेजीनाथ महाराज, महंत ईच्छागिरी महाराज आणि महंत व्यंकट अरण्य महाराज यांच्या संयुक्त प्रसिद्धीपत्रकातून प्रसिद्ध करण्यात आले.

0
6
7
8
4
1



