पुण्यधाम ट्रस्टकडून अतिवृष्टीग्रस्त महिला शेतकऱ्यांना मदतीचा हात “पर्याय” सामाजिक संस्थेच्या पुढाकारातून ४०० महिलांना दिलासा
पुण्यधाम ट्रस्टकडून अतिवृष्टीग्रस्त महिला शेतकऱ्यांना मदतीचा हात “पर्याय” सामाजिक संस्थेच्या पुढाकारातून ४०० महिलांना दिलासा
कळंब : भिकाजी जाधव
धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पुणे येथील पुण्यधाम ट्रस्ट यांच्या मदतीने आणि पर्याय सामाजिक संस्था, हसेगाव (के) यांच्या पुढाकाराने अर्थपूर्ण मदतकार्य हाती घेण्यात आले.

पर्यायचे कार्यवाहक विश्वनाथअण्णा तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमात १६ ऑक्टोबर रोजी कळंब तालुक्यातील अथर्डी गाव आणि पर्याय कॅम्पस येथे मदतवाटप कार्यक्रम पार पडला.

या उपक्रमांतर्गत १०० महिला शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पेरणीसाठी हरभरा बियाण्यांच्या पिशव्या, तसेच ३०० महिलांना साडी व ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. या मदतीमुळे अनेक महिला शेतकरी कुटुंबांना आगामी हंगामासाठी नवचैतन्य मिळाले आहे.

या कार्यक्रमास पर्याय संस्थेच्या सौ. अनिताताई तोडकर, विलास गोडगे, ऋषिकेश तोडकर, अनिकेत तोडकर यांच्यासह पुण्यधाम ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी पार पडावा यासाठी पुण्यधाम ट्रस्टचे पदाधिकारी तसेच पर्याय सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते बालाजी शेंडगे, सुनंदा खराटे, वैभव चोंदे, विकास कुदळे, प्रमिला राख, परमेश्वर गवारे, वंदना चिलवंत, अशोक शिंदे, दिगंबर लडके यांनी परिश्रम घेतले.
अतिवृष्टीग्रस्त भागातील महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरला आहे.



