ब्रेकिंगमहाराष्ट्र
कडक उन्हात ८१ वर्षीय आजीचे आमरण उपोषण; बनावट ठरावाविरोधात तुळजापूरात खळबळ
मृत व्यक्तीच्या नावावर १९७९ चा ठराव; गैरप्रकाराचा आरोप कडक उन्हात वृद्ध महिलेचा न्यायासाठी संघर्ष

0
7
6
4
8
6
कडक उन्हात ८१ वर्षीय आजीचे आमरण उपोषण; बनावट ठरावाविरोधात तुळजापूरात खळबळ
मृत व्यक्तीच्या नावावर १९७९ चा ठराव; गैरप्रकाराचा आरोप कडक उन्हात वृद्ध महिलेचा न्यायासाठी संघर्ष
तुळजापूर : वडिलोपार्जित मालमत्तेच्या नोंदीत झालेल्या कथित बनावट ठरावाविरोधात दिंडेगाव (ता. तुळजापूर) येथील ८१ वर्षीय सावित्राबाई शिवराम घोडके यांनी कडक उन्हात पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले असून, या प्रकारामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सावित्राबाई घोडके यांच्या सासऱ्यांचे, कै. बंडाप्पा सखाराम घोडके यांचे निधन ११ ऑगस्ट १९७८ रोजी झाले. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर तब्बल १५ महिन्यांनी, २२ नोव्हेंबर १९७९ रोजी ग्रामपंचायतीने ‘ठराव क्र. २२’ मंजूर केल्याचे दाखवून त्यांच्या नावाची नोंद कमी करण्यात आली. त्याऐवजी अन्य व्यक्तीचे नाव नोंदवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. मृत व्यक्तीच्या नावावर ठराव मंजूर करणे हा गंभीर प्रशासकीय गैरप्रकार असून, तो कायद्याने अवैध असल्याचे घोडके यांनी स्पष्ट केले आहे.या प्रकरणी संबंधित ठराव तात्काळ रद्द करून, सन १९७०-७१ च्या मूळ नोंदीनुसार मालमत्तेवर कै. बंडाप्पा घोडके यांचे नाव पूर्ववत नोंदवावे आणि अधिकृत ८-अ उतारा देण्यात यावा, अशी त्यांची मागणी आहे.दरम्यान, गटविकास अधिकाऱ्यांनी १० मार्च २०२६ रोजी आदेश देऊनही ग्रामसेवकांकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. उलट माहिती अधिकाराखाली दिशाभूल करणारी माहिती देऊन वेळकाढूपणा होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
१८ एप्रिलपर्यंत निर्णय नाही; २० पासून उपोषण सुरू प्रशासनाने १८ एप्रिलपर्यंत कोणताही लेखी निर्णय न घेतल्याने, सावित्राबाई घोडके यांनी २० एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून पंचायत समिती तुळजापूर कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या प्रकृतीला काही हानी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
वयोमानाचा विचार न करता कडक उन्हात उपोषण ८१ वर्षांच्या वयात आराम करण्याचे दिवस असताना, प्रखर उन्हाची तीव्रता सहन करत आजींनी न्यायासाठी घेतलेला हा लढा लक्षवेधी ठरत आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.
0
7
6
4
8
6



