धाराशिव तालुक्यातील तेर परिसरात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत !
धाराशिव तालुक्यातील तेर परिसरात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत !
तेर : प्रतिनिधी
धाराशिव तालुक्यातील तेर परिसरात रविवारी सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून, अच्यानक आलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आकाश कोसळल्याने नागरिक तसेच शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे मुळेवाडी शिवारातील ओढ्याला मोठ्या प्रमाणावर पाणी आले. या पाण्याच्या प्रवाहात अरुण विष्णुपंत सराफ यांच्या बैलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
संबंधित महसूल व पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करावा आणि बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी स्थानिक शेतकरी वर्गाची मागणी आहे.
गेल्या काही दिवसांपासून बदलत्या हवामानामुळे तालुक्यातील अनेक भागात अधूनमधून पावसाची हजेरी लागत आहे. या पावसामुळे काही ठिकाणी शेतातील उभी पिकेही नुकसानग्रस्त झाली आहेत.



