आई भवानीच्या दर्शनाने मिळते दैविक ऊर्जा — युवा नेते पूर्वेश सरनाईक
तुळजापूर नगरीत सरनाईक परिवाराच्या आगमनाने उत्साहाचे वातावरण
आई भवानीच्या दर्शनाने मिळते दैविक ऊर्जा — युवा नेते पूर्वेश सरनाईक
तुळजापूर नगरीत सरनाईक परिवाराच्या आगमनाने उत्साहाचे वातावरण !
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे परिवहन मंत्री मा. प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव, युवा सेना कार्याध्यक्ष मा.पूर्वेश सरनाईक यांनी दि.१४ ऑक्टोंबर रोजी सहकुटुंब तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी व महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांनी देवीकडे आशीर्वाद मागितले.
तुळजाभवानी मंदिरात सरनाईक परिवाराचे आगमन होताच भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. मंदिर परिसर “युवा सेना जिंदाबाद”च्या घोषणांनी दणाणून गेला. या वेळी युवा सेना जिल्हाध्यक्ष गणेश जगताप, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“आई भवानीच्या दर्शनाने मनाला अद्भुत समाधान आणि दैविक ऊर्जा लाभते. महाराष्ट्रातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी आणि राज्याच्या विकासासाठी आई भवानीचे आशीर्वाद लाभावेत,” अशी भावना मा. पूर्वेश सरनाईक यांनी व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले, “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली युवासेना राज्यातील तरुणांना नवी दिशा देत आहे. आजचा तरुण जागरूक, सक्षम आणि समाजभिमुख आहे. त्यांच्या हातात परिवर्तनाची ताकद आहे, आणि युवासेना त्या शक्तीला योग्य दिशा देण्याचे काम करत आहे.”
दर्शनानंतर मा. सरनाईक यांनी तुळजापूरमधील कार्यकर्त्यांशी संवाद साधत स्थानिक प्रश्नांवर चर्चा केली. युवाशक्ती एकत्र आणून समाजहिताच्या कामात सक्रिय राहण्याचा संदेश त्यांनी दिला.
दरम्यान, धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे विश्वासू आणि एकनिष्ठ युवा नेता गणेश जगताप यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेची संघटनात्मक ताकद सातत्याने वाढत आहे. नुकतेच धारूर येथे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते युवासेनेची नवीन शाखा स्थापन करण्यात आली होती.
मा. पूर्वेश सरनाईक यांच्या या भेटीमुळे तुळजापूर तालुक्यातील शिवसेना (शिंदे गट) आणि युवासेना कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण झाला आहे. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे आणि तरुणांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्यामुळे सरनाईक यांची प्रतिमा राज्यभरात एक प्रभावी, संवेदनशील आणि जनतेशी जोडलेला युवा नेता म्हणून अधिक बळकट होत आहे.
तुळजापूर नगरीत सरनाईक परिवाराच्या उपस्थितीने धार्मिकतेसोबतच राजकीय उर्जा आणि श्रद्धेचे अनोखे मिश्रण अनुभवायला मिळाले. मंदिर परिसर भक्तिभावाने आणि जयघोषांनी न्हाऊन निघाला.



