ब्रेकिंगमहाराष्ट्र
वीरशैव जंगम मठ ट्रस्टचा भव्य सत्कार सोहळा : नूतन नगराध्यक्ष, नगरसेवक व पत्रकारांचा सन्मान

0
6
7
8
4
1
वीरशैव जंगम मठ ट्रस्टचा भव्य सत्कार सोहळा : नूतन नगराध्यक्ष, नगरसेवक व पत्रकारांचा सन्मान
तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी
तीर्थक्षेत्र आई भवानीच्या पुण्यनगरीत दि. २४ जानेवारी रोजी तुळजापूर येथील वीरशैव जंगम मठ ट्रस्टच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी नूतन नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक तसेच विषेष पत्रकार यांच्या सत्काराचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष सद्गुरु ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर तुळजापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष विनोद गंगणे, बार्शी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. तेजस्विनी कथले,उपनगराध्यक्ष रामचंद्र रोचकरी,भाजप गटनेते औदुंबर कदम, काँग्रेस गटनेते अमोल कुतवळ,अक्षय ढोबळे, पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव साळुंखे, राजाभाऊ मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात श्री तुळजाभवानी मातेच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली.शिक्षणमहर्षी रा. गे.शिंदे गुरुजी यांच्या पत्नी कुसुमताई शिंदे यांच्या दुःखद निधनाबद्दल उपस्थितांनी उभे राहून श्रद्धांजली वाहिली.
यानंतर सद्गुरु औसेकर महाराज यांच्या हस्ते नूतन पदाधिकारी, सर्व नगरसेवक व पत्रकारांचा शाल, मोत्याचा हार, फेटा व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी बोलताना औसेकर महाराज म्हणाले,आज लोकसभा-विधानसभा निवडणुकांपेक्षा नगरपरिषद व ग्रामपंचायत निवडणुका अधिक कठीण झाल्या आहेत, कारण स्थानिक लोकप्रतिनिधीकडून जनतेच्या अपेक्षा फार मोठ्या असतात. त्यामुळे निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी पाच वर्षे जिद्द, चिकाटी व जबाबदारीने शहराच्या विकासासाठी काम केले पाहिजे. जनतेचे सेवक म्हणून वागणे हीच खरी लोकसेवा आहे.ते पुढे म्हणाले की, पंढरपूर येथे एका गरीब वारकरी महिलेला केवळ चित्रात पांडुरंगाचे दर्शन घेताना पाहून, तिला प्रत्यक्ष मंदिरात नेऊन विठ्ठलाचे दर्शन घडविले. पंढरपूरच्या विकासासाठी सातशे वर्षे जुने ऐतिहासिक रूप जपण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, वारकऱ्यांच्या सोयीसुविधांसाठी अनेक योजना राबविण्यात आल्या आहेत. गेल्या पाच वर्षांत शेकडो कोटी रुपयांचा निधी देणगी स्वरूपात जमा झाल्याचेही त्यांनी सांगितले.तुळजापूर हे संपूर्ण देशात शक्तीपीठ म्हणून प्रसिद्ध असून, येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अधिक सुविधा देण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी नगराध्यक्ष विनोद गंगणे, नगराध्यक्षा तेजस्विनी कथले व गटनेते अमोल कुतवळ यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ट्रस्ट सदस्य गुरुनाथ बडूरे यांनी केले. कार्यक्रमास ट्रस्ट अध्यक्ष प्रफुल मस्के, सचिव ॲड. गिरीश शेटे, तसेच सदस्य महाबळेश्वर तोडकरी, विश्वनाथ शेटे, श्रीकांत टाकणे, अभिषेक कोरे, अजिंक्य मस्के, महेश नडमने, प्रवीण नाडापुडे, महादेव तोडकरी, गौरीशंकर साखरे, अनंत वझे, अरुण तोडकरी, निलेश बचाटे, भारत कोप्पा, अनुप मस्के, पवन कोरे, विवेक कोरे, आलोक नडमने, तसेच सौ. अस्मिता शेटे, वैशाली धरणे, शारदा बडूरे, शुभांगी करीशेट्टी, राजश्री धरणे, शिवकांता साखरे, रेखा कोरे, ज्योती बचाटे, भक्ती शेटे यांची उपस्थिती होती.
0
6
7
8
4
1





