खासदार ओमराजेंचा ‘धडा’ – अधिकारी उभे, शेतकरी बसले! आदेशाला केराची टोपली, कामचुकारांना दणका बसणार?
खासदार ओमराजेंचा ‘धडा’ – अधिकारी उभे, शेतकरी बसले! आदेशाला केराची टोपली, कामचुकारांना दणका बसणार?
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथे दि. ६ ऑक्टोबर रोजी अतिवृष्टीग्रस्त काक्रंबा परिसरात जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत प्रशासनाला जबरदस्त झटका दिला. शेतकऱ्यांच्या समस्या ऐकण्यासाठी खासदार स्वतः गावात दाखल झाले; मात्र काही जबाबदार अधिकारी मात्र “फोन बंद करून अधिकारी गायब” अशी भूमिका घेत असल्याचे उघड झाले!

खासदारांनी पंचायत समिती गटविकास अधिकारी, तहसीलदार , कृषी विभागाचे अधिकारी आणि विद्युत महामंडळाचे अभियंते उपस्थित राहण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. पण आदेश असूनही काही अधिकारी बिनदिक्कत गैरहजर राहिले. यामुळे संतप्त झालेल्या खासदारांनी अधिकाऱ्यांची शाळाच घेतली.
बैठकीत शेतकऱ्यांना खाली बसवून अधिकाऱ्यांना उभं केलं, जसे शाळेत शिक्षक कामचुकार विद्यार्थ्यांना उभे करतात! “शेतकऱ्यांचे हक्काचे प्रश्न सोडवायला तुम्ही आहात की गायब व्हायला?” असा जाबही खासदारांनी अधिकाऱ्यांना विचारला.

काही अधिकार्यांचे मोबाईल बंद असल्याचे लक्षात आल्यानंतर खासदारांनी स्वतः फोन करून ‘हजेरी तपासणी’ केली. गावात झालेल्या या आढावा बैठकीला तब्बल १९ दिवस उलटून गेले, तरी परिस्थिती जसे थे असल्याचे चित्र दिसत आहे.
खासदार ओमराजेंच्या आदेशाकडे संबंधित विभागांनी दुर्लक्ष केले असल्याने कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



