ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
मूलभूत सुविधांचा बोजवारा; पत्रकारांची फरफट तुळजापूर निवडणूक विभागाचा ढिसाळ कारभार उघड, माध्यमांत संतापाची लाट

0
7
6
4
8
6
मूलभूत सुविधांचा बोजवारा; पत्रकारांची फरफट तुळजापूर निवडणूक विभागाचा ढिसाळ कारभार उघड, माध्यमांत संतापाची लाट
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान तुळजापूर येथील निवडणूक विभागाचा अत्यंत बेजबाबदार आणि नियोजनशून्य कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. अभियांत्रिकी महाविद्यालय, तुळजापूर येथे झालेल्या मतमोजणीच्या वृत्तांकनासाठी उपस्थित पत्रकारांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्यात आल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.मतमोजणी केंद्रावर कडक पोलिस बंदोबस्त असला तरी पत्रकारांची अद्ययावत यादीच पोलिसांकडे उपलब्ध नसल्याने, अधिकृत ओळखपत्रे दाखवूनही अनेक पत्रकारांना बराच वेळ अडवून ठेवण्यात आले. या प्रकारामुळे वृत्तांकनासाठी आलेल्या पत्रकारांची मोठी गैरसोय झाली. निवडणूक प्रशासन आणि पोलिस यंत्रणेमधील समन्वयाचा पूर्ण अभाव यानिमित्ताने स्पष्ट झाला.माध्यम कक्षाची स्थिती तर आणखीच दयनीय होती. मतमोजणी कक्षातून वेळेवर व अचूक माहिती मिळण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. परिणामी पत्रकारांना अंदाजावर बातम्या देण्याची वेळ आली. विशेष म्हणजे, माध्यम कक्षात पत्रकारांऐवजी उमेदवारांचे प्रतिनिधी ठिय्या मांडून बसल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. याबाबत मतमोजणी कक्षातील एकाही जबाबदार अधिकाऱ्याने दखल न घेतल्याने पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी पसरली.लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाशी असा दुजाभाव करणारा हा प्रकार निवडणूक विभागाच्या ढिसाळ नियोजनाचे आणि बेफिकीर वृत्तीचे जिवंत उदाहरण ठरला आहे. तुळजापूर येथील निवडणूक विभागाचा यावेळी अत्यंत बेजबाबदारपणा स्पष्टपणे दिसून आला असून, भविष्यात तरी माध्यमांसाठी योग्य नियोजन केले जाणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.’
0
7
6
4
8
6



