दिवाळीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक रणजित इंगळे यांचा समाजाभिमुख उपक्रम; गरजूंना किराणा साहित्य वाटप
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक रणजित इंगळे यांचा समाजाभिमुख उपक्रम; गरजूंना किराणा साहित्य वाटप
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
वाढत्या महागाईच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित व्हावा या उद्देशाने तुळजापूर शहरातील माजी नगरसेवक रणजित इंगळे यांनी यंदाही सामाजिक बांधिलकी जोपासत किराणा साहित्य वाटपाचा उपक्रम राबविला.

विश्वास काका विचार मंच आणि इंगळे मित्रमंडळ यांच्या वतीने भाऊबीज भेटीच्या स्वरूपात शनिवार, दि. १८ ते १९ ऑक्टोबर या दोन दिवसांत प्रभाग क्र. ७ मधील गोरगरीब व गरजू कुटुंबांना किराणा साहित्याचे किट वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा लाभ शेकडो कुटुंबांनी घेतला.

गेल्या अनेक वर्षांपासून रणजित इंगळे यांच्या पुढाकाराने सुरू असलेला हा सामाजिक उपक्रम आजही तेवढ्याच उत्साहात व सेवाभावी वृत्तीने पार पडला. प्रभागातील प्रत्येक सण, उत्सव अथवा संकटाच्या काळात सर्वसामान्यांच्या मदतीला तत्परतेने धावून जाण्याची इंगळे यांची परंपरा कायम आहे. त्यामुळे रणजित इंगळे यांचे नाव “जनतेचा नेता” म्हणून घेतले जाते.

माजी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण आणि विश्वास काका इंगळे यांच्या आदर्शाने प्रेरित होऊन, इंगळे मित्रमंडळाने धनत्रयोदशीच्या दिवशी हजारो गरजू कुटुंबांना किराणा साहित्य वाटप करून सामाजिक जबाबदारीचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले.

या कार्यक्रमाला नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार अमोल कुतवळ, अमर मगर, ऋषिकेश मगर, आनंद जगताप,गणेश आंदूरकर यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमाबद्दल नागरिकांकडून रणजित इंगळे व इंगळे मित्रमंडळाचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, दिवाळीच्या या उत्सवात त्यांनी दिलेला “सामाजिक गोडवा” सर्वांच्या मनात कायम राहणार आहे.दिवाळी गोड — समाजसेवेचा गोडवा अधिक!



