ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
केंद्र व राज्याच्या १२४ कल्याणकारी योजना तळागाळात पोहोचवण्यासाठी भाजप उमेदवारांना विजयी करा अपसिंगा येथील सभेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन
शेतकऱ्यांना वीजबिल माफी, कर्जमाफीचा निर्णय लवकरच – बावनकुळे

0
6
7
8
4
1
तुळजापूर | केंद्र व राज्य शासनाच्या १२४ विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी सिंदफळ जिल्हा परिषद गटातील तिन्ही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. अपसिंगा येथे सोमवारी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

यावेळी आमदार राणाजगजीतसिंह पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, तुळजापूर नगराध्यक्ष विनोद गंगणे, नितीन काळे, सुनील चव्हाण, सज्जनराव साळुंके, दिनेश बागल, आनंद कंदले यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वाखाली शेतकरी, महिला, युवक, गरीब व वंचित घटकांसाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सिंदफळ जिल्हा परिषद गटातील उमेदवार शितल ढाले, पंचायत समिती उमेदवार अनिताताई साळुंके व अपसिंगा पंचायत समिती उमेदवार मिरा क्षीरसागर यांना विजयी करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांनी तुळजापूरच्या आई तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा, पायाभूत सुविधा व जनहिताच्या कामांचा विशेष उल्लेख केला. महिलांसाठी लखपती दीदी योजना, लाडकी बहीण योजनेचा विस्तार, शेतकऱ्यांसाठी वीजबिल माफी, घरकुल योजना, गायरान व घरांच्या नियमितीकरणासह अनेक निर्णय भाजप सरकारने घेतल्याचे त्यांनी सांगितले.लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, ती अधिक व्यापक केली जाईल, असे आश्वासन देत त्यांनी मतदारांना “मतदान नव्हे तर मतकर्ज द्या” असे आवाहन केले.

0
6
7
8
4
1



