ब्रेकिंगमहाराष्ट्र
तीर्थक्षेत्र तुळजापूरला स्वच्छ व निर्जंतुकीकरण पाणीपुरवठा करण्याचा सभापती सागर कदम यांचा निर्धार
तीर्थक्षेत्र तुळजापूरला स्वच्छ व निर्जंतुकीकरण पाणीपुरवठा करण्याचा सभापती सागर कदम यांचा निर्धार

0
7
6
4
8
6
तीर्थक्षेत्र तुळजापूरला स्वच्छ व निर्जंतुकीकरण पाणीपुरवठा करण्याचा सभापती सागर कदम यांचा निर्धार

तुळजापूर : तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरातील नागरिकांना शुद्ध, सुरक्षित व निर्जंतुकीकरण केलेले पाणी नियमित मिळावे, या उद्देशाने नवनिर्वाचित पाणीपुरवठा सभापती सागर कदम यांनी कामाला सुरुवात केली असून त्यांनी शहरातील जलशुद्धीकरण केंद्र तसेच मंगळवार पेठ व शुक्रवार पेठ पाणीपुरवठा विभागाची सविस्तर पाहणी केली.

या पाहणीदरम्यान बोरी धरणातून व पाचुंदा तलावातून येणारे पाणी शहरापर्यंत कशा प्रकारे पोहोचते, त्या पाण्यावर कोणकोणत्या प्रक्रिया केल्या जातात, याची प्रत्यक्ष पाहणी करून सभापती कदम यांनी सखोल माहिती घेतली. पाणी शुद्धीकरण प्रक्रियेत वापरण्यात येणारी ब्लिचिंग पावडर, तुरटी व क्लोरीन गॅस यांचे महत्त्व, त्यांचे योग्य प्रमाण आणि वेळेवर वापर होणे किती आवश्यक आहे, यावर त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

शहरातील मंगळवार पेठ व शुक्रवार पेठ पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात समन्वय ठेवून नागरिकांना दर्जेदार पाणी मिळावे, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या. कोणत्याही परिस्थितीत पाणीपुरवठ्याच्या गुणवत्तेशी तडजोड केली जाणार नाही, असे सभापती सागर कदम यांनी यावेळी ठामपणे सांगितले.तुळजापूर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे येथे स्वच्छ आणि सुरक्षित पाणीपुरवठा ही केवळ जबाबदारी नाही, तर आपली कर्तव्यभावना आहे,असेही त्यांनी नमूद केले.या पाहणीवेळी नगरसेवक मधुकर शेळके, नगरपरिषद कर्मचारी महादेव शिंदे, विश्वास मोठे व अभिमान एकखंडे उपस्थित होते. सभापती सागर कदम यांच्या या पुढाकारामुळे शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम व विश्वासार्ह होईल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
0
7
6
4
8
6



