ब्रेकिंगमहाराष्ट्र
जिल्ह्यातील शेती, उद्योग आणि पर्यटनासाठी हजारो कोटींचे प्रकल्प; धाराशिवचा कायापालट अटळ : आमदार राणाजगजितसिंह पाटील
जिल्ह्यातील शेती, उद्योग आणि पर्यटनासाठी हजारो कोटींचे प्रकल्प; धाराशिवचा कायापालट अटळ : आमदार राणाजगजितसिंह पाटील

0
7
6
5
0
5
जिल्ह्यातील शेती, उद्योग आणि पर्यटनासाठी हजारो कोटींचे प्रकल्प; धाराशिवचा कायापालट अटळ : आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव । ज्ञानेश्वर गवळी
धाराशिव जिल्हा येत्या काळात केवळ कृषिप्रधान म्हणून नव्हे, तर उद्योग आणि पर्यटनाचे केंद्र म्हणून ओळखला जाईल. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी हजारो कोटी रुपयांचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागले असून, जिल्ह्याचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही, असा ठाम विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला.
कोंड येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या आणि प्रस्तावित विविध विकास प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली. कृष्णा खोऱ्यातील जिल्ह्याच्या हक्काचे २३.६६ टीएमसी पाणी लवकरच तुळजाभवानी मातेच्या चरणी असलेल्या रामदरा तलावात पोहोचणार असल्याचे त्यांनी सांगितले

डॉ. पद्मसिंह पाटील यांनी राजकीय वर्चस्व पणाला लावून हे पाणी मंजूर करून घेतल्यामुळे जिल्ह्यातील आठही तालुक्यांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील समुद्रात वाहून जाणारे पुराचे सुमारे ५० टीएमसी पाणी बोगद्याद्वारे मराठवाड्यात आणण्यासाठी १८ हजार कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रस्तावित असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले.

‘मित्र’ या संस्थेच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही जबाबदारी आपल्यावर सोपवली असून, या प्रकल्पासाठी जागतिक बँकेकडून सहकार्य मिळणार आहे. या प्रकल्पामुळे उजनी धरणातील पाण्याच्या जवळपास निम्मे पाणी जिल्ह्याला उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.पर्यटन आणि उद्योग क्षेत्रावर भर देत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करण्याचा सरकारचा मानस आहे. तुळजापूर येथील आई तुळजाभवानी मंदिर परिसराचा सुमारे २ हजार कोटी रुपये खर्चून कायापालट केला जात आहे. सध्या दरवर्षी दीड कोटी भाविक दर्शनासाठी येतात, ही संख्या पुढील काळात पाच कोटींवर नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

तेर येथील प्राचीन वारसा आणि येडशी येथील रामलिंग अभयारण्यात १८ कोटींच्या गुंतवणुकीतून पर्यटन विकासाची कामे युद्धपातळीवर सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.उद्योग क्षेत्रात माळुंब्रा येथे एक हजार एकरवर ‘तारा’ प्रकल्प, वडगाव सिद्धेश्वर येथे लघुउद्योजकांसाठी भूखंड आणि वाशी येथे नवीन एक हजार एकरची एमआयडीसी उभारली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. धाराशिव–सोलापूर रेल्वे प्रकल्पाला पूर्वी निधीअभावी विलंब झाला होता; मात्र महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर कामाला गती मिळाली असून लवकरच ‘तुळजाभवानी एक्सप्रेस’ धावणार असल्याचे त्यांनी सांगितले.महिला सक्षमीकरणासाठी ‘लखपती दीदी’ योजनेतून पाच लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज, वीजबिल माफी, दिवसा वीजपुरवठ्यासाठी सौर ऊर्जेवर भर, तसेच गायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करून घरकुल देण्याचा निर्णय घेतल्याचेही आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.केंद्रात आणि राज्यात आपलेच सरकार असल्याने निधी कमी पडणार नाही. जिल्हा परिषद व पंचायत समितीत महायुतीची सत्ता आल्यानंतर विकासकामांना आणखी गती मिळेल. त्यामुळे महायुतीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
0
7
6
5
0
5




