धाराशिव जिल्ह्यातील पुरग्रस्त महिलांना ‘लेक लाडकी अभियान’ आणि ‘पर्याय संस्था’चा मदतीचा हात
धाराशिव जिल्ह्यातील पुरग्रस्त महिलांना ‘लेक लाडकी अभियान’ आणि ‘पर्याय संस्था’चा मदतीचा हात
धाराशिव जिल्ह्यातील पुरग्रस्त महिलांना ‘लेक लाडकी अभियान’ आणि ‘पर्याय संस्था’चा मदतीचा हात
कळंब : प्रतिनिधी
धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले असताना, या संकटग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात देण्यासाठी ‘लेक लाडकी अभियान महाराष्ट्र’ आणि ‘पर्याय सामाजिक संस्था’ पुढे सरसावल्या आहेत. दिनांक १२ ऑक्टोबर रोजी पर्याय संस्था प्रशिक्षण केंद्र येथे एकूण २०० किराणा किट्स आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमासाठी लेक लाडकी अभियानाच्या प्रमुख ॲड. वर्षाताई देशपांडे यांनी स्वतः सातारा जिल्ह्यातील विविध संस्था, संघटना आणि दानशूर व्यक्तींकडून मदतीसाठी साहित्य जमा केले. ही मदत त्यांनी स्वखर्चाने टेम्पोने हासेगाव (ता. केज) येथील पर्याय संस्था कॅम्पस येथे पोहोचवली.

या मदतीत पुरग्रस्त कुटुंबांतील महिला, एकल महिला आणि विधवा महिलांना किराणा किट्स तसेच जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. या प्रसंगी बोलताना ॲड. वर्षाताई देशपांडे म्हणाल्या, “पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना योग्य आणि तातडीची मदत करणे ही शासनाची जबाबदारी आहे. गावातील अंगणवाडी, शाळा तसेच घरांचे झालेले नुकसान याचा सविस्तर पंचनामा करून शासनाने तत्काळ आर्थिक मदत द्यावी. तसेच शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान, जमीन खरडून जाणे यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे; त्यामुळे अशा शेतकऱ्यांनाही भरीव मदत देणे आवश्यक आहे.”
या मदतवाटप कार्यक्रमाचे आयोजन पर्याय सामाजिक संस्थेचे कार्यवाहक विश्वनाथअण्णा तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विलास गोडगे, भिकाजी जाधव, बालाजी शेंडगे, सुनंदा खराटे, विकास कुदळे, रोहिणी कोठावळे, रियाज शेख, वैभव चोंदे, कल्पना जतकर, आशाबाई तोडकर, माया लडके, अशोक शिंदे, दिगंबर लडके आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
या उपक्रमामुळे पुरग्रस्त महिलांच्या चेहऱ्यावर दिलासा उमटला असून, ‘लेक लाडकी अभियान’ आणि ‘पर्याय संस्था’च्या या समाजाभिमुख कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.



