तरच महायुती; अन्यथा स्वतंत्र लढणार राष्ट्रवादीचा ठाम बाणा
तरच महायुती; अन्यथा स्वतंत्र लढणार राष्ट्रवादीचा ठाम बाणा
तरच महायुती; अन्यथा स्वतंत्र लढणार
राष्ट्रवादीचा ठाम बाणा
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
जाहीर झालेल्या नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटकपक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना योग्य न्याय मिळायलाच हवा. जागावाटपात समसमान सन्मान न मिळाल्यास आम्हाला स्वतंत्र लढण्याची परवानगी द्यावी. अन्यथा राष्ट्रवादी स्वतंत्र लढेल, अशी ठाम मागणी तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सूर्यवंशी यांनी केली.

मुंबई येथे झालेल्या जिल्हा आढावा बैठकीत सूर्यवंशी यांनी ही भूमिका थेट पक्षाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर मांडली. महायुती टिकून राहावी यासाठी वरिष्ठ पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन पक्षश्रेष्ठींनी दिल्याचेही त्यांनी सांगितले.मुंबईस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार गट) प्रदेश कार्यालयात गुरुवारी (६ नोव्हेंबर) धाराशिव जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, कृषीमंत्री व जिल्हा संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि सरचिटणीस शिवाजी गर्जे उपस्थित होते.

तुळजापूर नगरपालिका नगराध्यक्ष पद तसेच नळदुर्ग नगरपंचायत नगराध्यक्ष पद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला द्यावेत, अशी जोरदार मागणी श्रीकृष्ण सूर्यवंशी यांनी बैठकीत केली. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीची ताकद दाखवण्यासाठी ही दोन्ही पदे मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



