Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

तुळजापूरात बेकायदेशीर धंद्यांवर कारवाईची मागणी; विविध विभागांकडे संयुक्त तक्रार

तुळजापूरात बेकायदेशीर धंद्यांवर कारवाईची मागणी; विविध विभागांकडे संयुक्त तक्रार

0 7 6 4 8 6

तुळजापूरात बेकायदेशीर धंद्यांवर कारवाईची मागणी; विविध विभागांकडे संयुक्त तक्रार

तुळजापूर : धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या तुळजापूर शहरात बेकायदेशीर दारू विक्री, प्रतिबंधित गुटखा विक्री, मटका-जुगार अड्डे तसेच बसस्टॅण्ड परिसरातील काही लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाबाबत सखोल चौकशी करून तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मीकांत (बालाजी) रामचंद्र जाधव यांनी संयुक्त तक्रार अर्जाद्वारे विविध शासकीय विभागांकडे केली आहे.अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे तालुका अध्यक्ष असलेल्या जाधव यांनी महाराष्ट्र राज्याचे लोकायुक्त, राज्य महिला आयोग, राष्ट्रीय मानवी हक्क आयोग, मुख्यमंत्री, गृह विभागाचे प्रधान सचिव, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, अन्न व औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभाग, एटीएस, एसीबी तसेच तुळजापूर पोलीस ठाणे यांच्याकडे ही तक्रार सादर केली आहे.तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, तुळजापूर शहरात विविध भागात परवानगीशिवाय देशी व विदेशी दारूची विक्री सुरू असून रात्री उशिरापर्यंत गुप्तपणे दारू पुरवठा होत असल्याची माहिती आहे. अल्पवयीन मुलांनाही दारू विक्री होत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत भांडणे, महिलांना त्रास तसेच अपघाताच्या घटना घडत असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.तसेच शासनाने बंदी घातलेला गुटखा, सुगंधी तंबाखू व इतर प्रतिबंधित पदार्थ शहरातील पानटपऱ्या, किराणा दुकाने तसेच शाळा परिसरात खुलेआम विक्रीस उपलब्ध असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे युवकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे नमूद करत अन्न व औषध प्रशासनाच्या तपासण्या अपुऱ्या असल्याचेही सांगण्यात आले आहे.शहरातील काही ठिकाणी मटका, जुगार क्लब व इतर जुगार अड्डे सुरू असून मोठ्या प्रमाणावर पैशांची देवाणघेवाण होत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यामुळे अनेक युवक आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होत असून गुन्हेगारीकडे प्रवृत्त होत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.बसस्टॅण्ड परिसरातील काही लॉजमध्ये बाहेरील महिलांना आणून खोल्या तासावर देऊन वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळत असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. लॉजच्या नोंदवहीत खोटी किंवा अपूर्ण माहिती नोंदवली जात असल्याची शक्यता व्यक्त करत संबंधित लॉजची संयुक्त तपासणी करून सर्व परवाने, एनओसी, मंजूर नकाशा, कर पावत्या, जीएसटी नोंदणी तसेच पोलिस परवानगीची पडताळणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. नियमभंग आढळल्यास संबंधित लॉज सील करून मालक व व्यवस्थापकाविरुद्ध दंडात्मक व फौजदारी कारवाई करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.तक्रारीत पुढे म्हटले आहे की, शहरात गावठी कट्टे, चक्री, मटका तसेच ‘तिरट’ नावाचा डावही बऱ्याच दिवसांपासून राजरोसपणे सुरू आहे. या प्रकारांना कोण खतपाणी घालत आहे याची जिल्हा पोलिस अधीक्षक रितू खोकर यांनी स्वतः दखल घेऊन सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.तक्रारीची सात दिवसांत दखल घेऊन लेखी स्वरूपात कारवाई अहवाल सादर करावा, अन्यथा उच्चस्तरीय प्राधिकरणांकडे तसेच न्यायालयीन मार्गाचा अवलंब करण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मीकांत (बालाजी) रामचंद्र जाधव यांची स्वाक्षरी आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे