Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

धाराशिवच्या रस्त्यांची दुर्दशा नेमकी कुणामुळे? दोन वर्षे रखडलेल्या १४० कोटींच्या निविदांची एसआयटी चौकशी करा! – आमदार कैलास पाटील यांची विधानसभेत घणाघाती मागणी

0 7 6 5 0 6

धाराशिवच्या रस्त्यांची दुर्दशा नेमकी कुणामुळे? दोन वर्षे रखडलेल्या १४० कोटींच्या निविदांची एसआयटी चौकशी करा! – आमदार कैलास पाटील यांची विधानसभेत घणाघाती मागणी

धाराशिव, : प्रतिनिधी

धाराशिव शहरातील रस्त्यांची झालेली चाळण, खड्यांमुळे होत असलेले अपघात आणि नागरिकांचे उध्वस्त होत चाललेले दैनंदिन जीवन… या सर्वांचा मूळ कारन ठरलेल्या गेल्या बावीस महिन्यांपासून रखडलेल्या १४० कोटींच्या रस्ते निधीच्या निविदा प्रक्रियेची आता एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी धडाडीत मागणी शिवसेना (उबाठा) आमदार कैलास घाडगे पाटील यांनी थेट विधानसभेत केली.

हिवाळी अधिवेशनातील प्रश्नोत्तराच्या तासात नगरविकास खात्याकडे थेट सवालांचा भडीमार करताना पाटील म्हणाले की —
“निविदा प्रक्रिया कोणामुळे थांबली? बावीस महिने एका निविदेला का अडकवण्यात आले? गतिशील महाराष्ट्र म्हणत असताना विकासकामांवरच ब्रेक का लावला?”

फेब्रुवारी २०२४ मध्ये नगरविकास मंत्र्याकडून १४० कोटींचा रस्ते निधी मंजूर होऊनसुद्धा, निविदा-स्थगितीच्या चक्रात तो अडकला. त्याचा फटका शहरातील नागरिकांना बसत असून, खड्ड्यांमुळे अनेक अपघात, मृत्यू आणि शेकडो जखमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नगरविकास खात्याने दोन वेळा केलेल्या चौकशीत परस्परविरोधी निर्णय दिल्याचा मुद्दा देखील त्यांनी तीव्रतेने उपस्थित केला.

उद्यानं, आठवडी बाजार, पाणीपुरवठा… सर्वच कामांवर स्थगितीचा पेच!

शहरातील उद्यानांसाठी, आठवडी बाजारासाठी मंजूर निधीवरही स्थगिती देण्यात आली असून, धाराशिवसारख्या जिल्हा मुख्यालयात एकही उद्यान नसल्याची खंत आमदारांनी व्यक्त केली.
उच्च न्यायालयाने स्थगिती उठविण्यास सरकारला सूचित केले असतानाही त्या दिशेने हालचाल न झाल्याचे त्यांनी ठणकावले.

वित्त आयोगाचा निधी कोसळला… नगरपालिका आर्थिकदृष्ट्या विघटित

पूर्वी १५ कोटी मिळणारा वित्त आयोगाचा निधी आता केवळ ३–४ कोटींवर आला असल्याचा गंभीर मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
“वित्त आयोगाचा एकही हप्ता गेल्या वर्षात मिळालेला नाही, नगरपालिका आर्थिक कोलमडलीय… मग रस्ते, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन कसे होणार?” असा सवाल करून तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली.

कचरा डेपो शहरात… श्वसनाचे विकार वाढले!

शहराच्या मध्यवस्तीत आलेला कचरा डेपो, वाढलेले कचऱ्याचे डोंगर आणि नागरिकांना होणारे श्वसनाचे त्रास याकडे लक्ष वेधून भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी कचरा डेपो तातडीने शहराबाहेर हलवण्याची मागणी त्यांनी केली.

चार गावांची पाणीपुरवठा योजना ठप्प – ५० हजार लोक त्रस्त

तेर, ढोकी, कसबे तुडवळा आणि येडशी या गावांच्या पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित झाल्याने योजना बंद आहे.सौरऊर्जा प्रकल्प उभारूनही वीजदेयक व मिटरिंग समस्येमुळे योजना ठप्पच.
ही योजना पुन्हा सुरू करण्यासाठी हप्त्याने वीज देयक भरण्याची परवानगी आणि तत्काळ विद्युतपुरवठा सुरू करण्याचे निर्देश द्यावेत, अशी ठाम मागणी त्यांनी सभागृहात केली.

आमदार कैलास पाटील यांच्या या मुद्देसूद, धारदार आणि आक्रमक मांडणीमुळे शहराच्या रस्त्यांपासून ते पाणीपुरवठा व कचरा व्यवस्थापनापर्यंतचे प्रलंबित प्रश्न पुन्हा एकदा अधिवेशनाच्या केंद्रस्थानी आले आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे