ब्रेकिंगमहाराष्ट्र
लोहारा तालुक्यात घरफोडी; अडीच लाखांचा ऐवज लंपास

0
7
6
5
0
5
लोहारा : तालुक्यातील होळी (ता. लोहारा) येथे अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री घरफोडी करून तब्बल २ लाख ४३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाकर भिल्लु राठोड (वय ६०, रा. होळी, ता. लोहारा, जि. धाराशिव) हे आपल्या घरात झोपलेले असताना दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरात प्रवेश केला. चोरट्याने घरातील लोखंडी कपाटातील पेटी उघडून त्यामधील मौल्यवान दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याचे निष्पन्न झाले आहे.चोरट्याने सोन्याचे सुमारे ९ ग्रॅम वजनाचे दागिने, चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम १ लाख ८० हजार रुपये असा एकूण २ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. सकाळी घरातील कपाट उघडे व सामान अस्ताव्यस्त दिसल्यानंतर ही चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर फिर्यादी प्रभाकर राठोड यांनी तात्काळ लोहारा पोलीस ठाण्यात धाव घेऊन घटनेची माहिती दिली.फिर्यादीने दिलेल्या प्रथम खबरेवरून लोहारा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील कलम ३३१(४), ३०५(अ) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, पंचनामा करण्यात आला आहे. परिसरातील नागरिकांकडून चौकशी सुरू असून, संशयितांचा शोध घेण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.अलीकडच्या काळात तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी नागरिकांना घरांची योग्य ती काळजी घेण्याचे तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळविण्याचे आवाहन केले आहे.
0
7
6
5
0
5



