एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार तुळजापूरात शिवसेनेचा झपाट्याने विस्तार
शिवसेना संघटन बळकट करण्यासाठी तुळजापूरात उत्साहाची लाट;तब्बल ४५ हून अधिक शाखांचे उद्घाटन
एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार तुळजापूरात शिवसेनेचा झपाट्याने विस्तार
शिवसेना संघटन बळकट करण्यासाठी तुळजापूरात उत्साहाची लाट;तब्बल ४५ हून अधिक शाखांचे उद्घाटन
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि पक्ष संघटना बळकट करण्याच्या हेतूने तुळजापूर तालुक्यात शिवसेनेचा विस्तार वेगाने सुरू आहे. पक्षाचे सचिव संजय मोरे, उपनेते ज्ञानराज चौगुले, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक, सहसंपर्कप्रमुख भगवान देवकते तसेच धाराशिव जिल्हाप्रमुख मोहन पनुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील प्रत्येक गावात शाखा स्थापन करण्याचा उपक्रम जोमात राबविण्यात येत आहे.
नुकतेच काटी, वडगाव काटी व बिजनवाडी या गावांमध्ये झालेल्या शाखा उद्घाटन सोहळ्यांना मोठा उत्साह लाभला. या कार्यक्रमात तालुकाध्यक्ष अमोल जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या नेतृत्वाखाली सध्या तुळजापूर तालुक्यात एकामागोमाग एक गावांमध्ये शाखा उघडण्याचा धडाका सुरू असून, आतापर्यंत तब्बल ४५ हून अधिक शाखांचे उद्घाटन संपन्न झाले आहे.
या प्रसंगी बोलताना तालुकाध्यक्ष अमोल जाधव म्हणाले,“शिवसेना पक्षप्रमुख मा. एकनाथ शिंदे साहेबांचे विचार, कार्यपद्धती आणि विकासाचे धोरण प्रत्येक गावापर्यंत पोहोचवणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने गावोगावी पक्षाची संघटना मजबूत करून जनतेच्या समस्या सोडवण्याचे कार्य हाती घ्यावे.”
या सोहळ्याला संबंधित गावांतील शाखाध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटनावेळी गावातील युवकांचा आणि कार्यकर्त्यांचा उत्साह गगनाला भिडल्याचे दृश्य पाहायला मिळाले.
कार्यक्रमास तुळजापूर शहरप्रमुख बापूसाहेब भोसले, शहर उपाध्यक्ष रमेश चिवचिवे, संभाजी नेपते, शहाजी हाके, स्वप्निल सुरवसे, संजय लोंढे, नितीन मस्के, गणेश पाटील, विकास जाधव, भुजंग मुकेरकर यांसह शिवसेनेचे अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उत्साहवर्धक उपक्रमामुळे तुळजापूर तालुक्यातील शिवसेना संघटन अधिक सक्षम व बळकट होत असून, पक्षाच्या आगामी निवडणुकांसाठी मजबूत पायाभरणी होत असल्याचे राजकीय वर्तुळातून सांगण्यात येत आहे.
🟧 शिवसेनेचा झेंडा आता प्रत्येक गावात फडकणार — तुळजापूर तालुक्यात संघटन विस्ताराचा जोश ओसंडून वाहतोय!




