धाराशिव निवडणुकीत पक्षपाती अधिकाऱ्यांचा”स्फोट”! फेक एक्झिट पोल प्रकरणाने खळबळ
आचारसंहितेची धज्जी उडाली? निर्णय अधिकारी आणि चॅनलवर गुन्ह्यांची टांगती तलवार !

धाराशिव निवडणुकीत ‘पक्षपाती अधिकाऱ्यांचा’स्फोट! फेक एक्झिट पोल प्रकरणाने खळबळ
आचारसंहितेची धज्जी उडाली? निर्णय अधिकारी आणि चॅनलवर गुन्ह्यांची टांगती तलवार !
धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी
धाराशिव नगरपरिषद निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख यांच्यावर पक्षपातीपणाचे धक्कादायक आरोप झालेला असून”धाराशिव 2.0″या सोशल मीडिया चॅनलने आचारसंहितेचा उघड भंग केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे जिल्हा प्रवक्ते ॲड, विशाल साखरे यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी तसेच सायबर सेलकडे तक्रार दाखल करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या भूमिकेवर संशयाची छाया
ॲड, साखरे यांनी आपल्या तक्रारीत दावा केला आहे की,२१ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रभाग क्रमांक ९‘अ’मधील अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेदरम्यान अधिकारी ओंकार देशमुख यांनी संशयास्पद वर्तन केले. उमेदवारांना चुकीची माहिती देणे, प्रक्रिया सुरू असताना खाजगी केबिनमध्ये जाऊन फोनवर संभाषण करणे, तसेच घटनास्थळी असलेले सीसीटीव्ही फुटेज व कॉल रेकॉर्ड (CDR) मागूनही न देणे याकडे गंभीर अनियमितता म्हणून पाहिले जात आहे.
सोनाली माने यांच्या अर्जातील “तारखांचा गोंधळ” चर्चेत
प्रभाग २‘अ’मधील उमेदवार सौ. सोनाली स्वप्निल माने यांचा अर्ज “चुकीच्या पद्धतीने अवैध” ठरवण्यात आल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. सुनावणी १९ नोव्हेंबर रोजी घेऊन, निकाल मात्र मागील तारखेला म्हणजे १८ नोव्हेंबर दाखवण्यात आल्याचा दावा साखरे यांनी केला. हा प्रकार लोकशाही प्रक्रियेवरील प्रश्नचिन्ह निर्माण करणारा असल्याची तीव्र टीका करण्यात आली आहे.
फेक एक्झिट पोलचा गाजलेला वाद
आचारसंहिता लागू असताना १ डिसेंबर २०२५ रोजी “धाराशिव 2.0″या चॅनलने फेक एक्झिट पोल प्रसिद्ध केला.यामध्ये भाजप उमेदवाराला आघाडी तर राष्ट्रवादी (शरद पवार गट) उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकावर दाखवत मतदारांची दिशाभूल केल्याचा आरोप आहे.
या विरोधात संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही त्यांनी दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
गुन्हे दाखल करण्याची मागणी
ॲड,विशाल साखरे यांनी निवडणूक अधिकारी आणि संबंधित चॅनलवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 171, 174, 175, 172, 318, 198, 199 तसेच लोकप्रतिनिधी कायदा 1951 चे कलम 188 आणि 123 अन्वये गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. धाराशिव नगरपरिषद निवडणुकीत हे प्रकरण चांगलेच गाजत असून, पुढील कारवाईकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.




