Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

मराठवाड्यातील पूरग्रस्तांना सांगलीच्या धर्तीवर तिप्पट मदत द्या: शेतकरी नेते अनिल जगताप यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मराठवाड्यातील पूरग्रस्तांना सांगलीच्या धर्तीवर तिप्पट मदत द्या: शेतकरी नेते अनिल जगताप यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0 7 6 4 8 6

मराठवाड्यातील पूरग्रस्तांना सांगलीच्या धर्तीवर तिप्पट मदत द्या: शेतकरी नेते अनिल जगताप यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

धाराशिव: यावर्षी मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २०१९ साली सांगली महापूरग्रस्तांना देण्यात आलेल्या मदतीच्या धर्तीवर, एनडीआरएफच्या निकषांच्या तिप्पट नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी जोरदार मागणी शेतकरी नेते अनिल जगताप यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ई-मेलद्वारे केली आहे.

मराठवाड्यात, विशेषतः धाराशिव जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. जिल्ह्यात सरासरीच्या तब्बल १६१ टक्के पाऊस झाला असून, अनेक ठिकाणी जमिनी खरवडून गेल्या आहेत, पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, पशुधन वाहून गेले आहे, १५ पाझर तलाव फुटले आहेत आणि सहा जणांचा पुरात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या गंभीर परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

अनिल जगताप यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “शासनाकडून मिळणारी सध्याची मदत अत्यंत तुटपुंजी आहे. सांगली, कोल्हापूर येथे महापूर आल्यावर राज्य शासनाने २९ ऑगस्ट २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार एनडीआरएफच्या निकषाच्या तिप्पट मदत दिली होती. तोच न्याय मराठवाड्यातील शेतकऱ्यांनाही मिळावा.”

धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी २३ सप्टेंबर रोजीच्या शासन निर्णयानुसार, ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीसाठी २ लाख ३४ हजार ९७७ शेतकऱ्यांना १८९ कोटी ६० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मात्र, सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीबाबतचा शासन निर्णय अद्याप प्रलंबित असल्याने शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

केवायसी पोर्टल बंद, शेतकरी अनुदानाला मुकले एकीकडे या वर्षीच्या मदतीची मागणी होत असताना, दुसरीकडे उमरगा आणि लोहारा तालुक्यातील शेतकरी गेल्या वर्षीच्याच अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. अतिवृष्टी २०२४ साठी मंजूर झालेले ८६ कोटी ४६ लाख रुपयांचे अनुदान केवायसी पोर्टल बंद असल्याने अडकून पडले आहे. केवळ ६० टक्के शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असून, १ सप्टेंबरपासून पोर्टल बंद असल्याने ४० टक्के शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. शासनाने हे पोर्टल तातडीने सुरू करून सर्व पात्र शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, असे आवाहनही जगताप यांनी केले आहे.

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे