ब्रेकिंगमहाराष्ट्र
वयोवृद्ध शेतवस्तीवरील दरोडेखोर गजाआड; एलसीबी धाराशिवची धडाकेबाज कामगिरी

0
7
6
4
8
6
वयोवृद्ध शेतवस्तीवरील दरोडेखोर गजाआड; एलसीबी धाराशिवची धडाकेबाज कामगिरी
धाराशिव : शेतवस्तीवर एकट्या राहणाऱ्या वयोवृद्ध नागरिकांना लक्ष्य करून जबरी चोरी व दरोडे टाकणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) धाराशिवने गजाआड केले असून, या कारवाईत चार सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून तब्बल आठ गुन्हे उघडकीस आले असून दोन लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.दि. ७ जानेवारी २०२६ रोजी रात्री उपळा शिवार येथील शेतवस्तीवरील घरात कविता ज्ञानदेव कसबे या एकट्या राहत असताना अज्ञात आरोपींनी घरात घुसखोरी करून त्यांना मारहाण केली व सोन्याचे दागिने लंपास केले. या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०५/२०२६ अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गंभीर घटनेची दखल घेत पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार सपोनि सुदर्शन कासार व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. दि. १० जानेवारी २०२६ रोजी गोपनीय बातमीदाऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार पथकाने मोहा, ता. कळंब येथील पारधी पिढीवर छापा टाकून चार संशयितांना ताब्यात घेतले.
सखोल चौकशीत आरोपींनी उपळा शिवार येथील जबरी चोरीसह दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी धाराशिव विमानतळ परिसरात दरोडा टाकल्याची तसेच गोळेगाव (ता. वाशी) व अंतरवली (ता. भूम) येथे चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींकडून १६.२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच शिर्डी व जामखेड येथून चोरीस गेलेल्या चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.
या कारवाईत एकूण दरोडा, जबरी चोरी व वाहनचोरीचे आठ गुन्हे उघडकीस आले असून सुमारे २ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अनिल उर्फ लल्ल्या बादल शिंदे, छगन श्रीपती काळे, बिभीषण उर्फ बबड्या दिलीप काळे व विजय उर्फ तुंबड्या आप्पा पवार (सर्व रा. मोहा, ता. कळंब, जि. धाराशिव) अशी आहेत.सदर आरोपींना जप्त मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक रितू खोकर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार व त्यांच्या पथकाने यशस्वी केली.
0
7
6
4
8
6



