ब्रेकिंगमहाराष्ट्र
गारपिटीचा तडाखा; लोहारा परिसरात गाराचा पाऊस
गारपिटीचा तडाखा; लोहारा परिसरात गाराचा पाऊस

0
7
6
4
8
6
गारपिटीचा तडाखा; लोहारा परिसरात गाराचा पाऊस
लोहारा : तालुक्यातील लोहारा मोघा खेड परिसरात मंगळवारी (दि.१७ मार्च) सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास अचानक गारांचा पाऊस कोसळला. या अनपेक्षित गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना मोठा फटका बसला असून, परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दुपारपासूनच वातावरणात बदल जाणवत होता. ढगाळ वातावरण, वाऱ्याचा वेग वाढणे आणि अचानक गारांसह पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची एकच धावपळ उडाली. काही ठिकाणी मोठ्या आकाराच्या गारा कोसळल्याने शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. विशेषतः हरभरा, गहू आणि भाजीपाला पिकांना मोठा फटका बसल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे.गारपिटीमुळे शेतातील पिके आडवी पडली असून, अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे. आधीच अवकाळी पावसामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट कोसळल्याची भावना व्यक्त होत आहे. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याचेही दिसून आले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची तयारी दर्शवावी. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. शासनाने त्वरित सर्वेक्षण करून नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.या गारपिटीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी सुरक्षित स्थळी आसरा घेतला. सुदैवाने जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे डोळे आता शासनाच्या मदतीकडे लागले आहेत.
0
7
6
4
8
6



