देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची राजकीय रणनीती ठरली यशस्वी; धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदी अर्चना पाटील तर उपाध्यक्षपदी उषा गायकवाड
महायुती नेत्यांकडून नूतन पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव

0
7
6
4
8
7
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची राजकीय रणनीती ठरली यशस्वी; धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदी अर्चना पाटील तर उपाध्यक्षपदी उषा गायकवाड

धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी
धाराशिव जिल्हा परिषदेत महायुतीचा झेंडा फडकत असून अध्यक्षपदी अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील तर उपाध्यक्षपदी उषा रविंद्र गायकवाड यांची निवड झाली.

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या आक्रमक राजकीय रणनीतीमुळे जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता प्रस्थापित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.अध्यक्षपदासाठी अर्चनाताई पाटील आणि कांचनमाला उत्कर्ष संगवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मतदान प्रक्रियेत अर्चनाताई पाटील यांना तब्बल ४५ मते मिळाली, तर संगवे यांना ०९ मते मिळाली. त्यामुळे अर्चनाताई पाटील यांनी स्पष्ट बहुमताने अध्यक्षपद पटकावले.उपाध्यक्षपदासाठी उषा रविंद्र गायकवाड आणि महेश देशमुख यांच्यात लढत झाली. या निवडणुकीत उषाताई गायकवाड यांना ४५ मते, तर महेश देशमुख यांना १० मते मिळाली. त्यामुळे गायकवाड यांचीही उपाध्यक्षपदी निवड निश्चित झाली.
निवड प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्हा परिषदेच्या परिसरात सकाळी ९ वाजल्यापासून कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळच्या सत्रात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली, तर दुपारी २ वाजता यशवंतराव चव्हाण सभागृहात सभेला सुरुवात झाली.दरम्यान, गेल्या ३२ दिवसांपासून सहलीवर असलेले जिल्हा परिषद सदस्य तुळजापूर येथील “द स्कायलॅन्ड” हॉटेलमध्ये पोलिस बंदोबस्तात ठेवण्यात आले होते. त्यानंतर तुळजापूरहून त्यांना कडेकोट बंदोबस्तात धाराशिव येथे आणण्यात आले.या निवडणुकीत जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून, तर जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून कामकाज पाहिले.
या विजयाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पालकमंत्री प्रताप सरनाईक तसेच आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्यासह महायुतीतील अनेक नेत्यांनी समाधान व्यक्त केले.नूतन अध्यक्षा अर्चनाताई पाटील या माजी मंत्री राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी असून उपाध्यक्ष उषाताई गायकवाड या शिवसेनेचे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी आहेत. जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता आल्याने जिल्ह्यातील राजकारणाला नवे समीकरण मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

0
7
6
4
8
7



