आपसिंगा-काक्रंबा जलयोजनेच्या चौकशीत विलंब — अधिकाऱ्यांकडून निष्काळजीपणा!
आपसिंगा-काक्रंबा जलयोजनेच्या चौकशीत विलंब — अधिकाऱ्यांकडून निष्काळजीपणा!
आपसिंगा-काक्रंबा जलयोजनेच्या चौकशीत विलंब — अधिकाऱ्यांकडून निष्काळजीपणा!
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा व काक्रंबा या संयुक्त पाणीपुरवठा योजनेच्या चौकशीसंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, लातूर यांच्या कार्यालयातून २९ ऑक्टोबर रोजी एक गंभीर पत्र पाठविण्यात आले आहे. या पत्रातून योजनेतील चौकशी प्रक्रियेत होत असलेल्या विलंबाबाबत स्पष्ट नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
दि. 19 सप्टेंबर रोजी आपसिंगा ग्रामपंचायत कार्यालय येथे योजनेची पाहणी करण्यात आली होती. त्या वेळी पाईपलाईनची खोली तपासण्यासाठी चाचणी खडडे घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, एक महिन्यानंतरही हे चाचणी खडडे घेण्यात आलेले नाहीत, असे कार्यकारी अभियंता ए. एस. पाटील यांनी नमूद केले आहे.
तसेच चौकशीसाठी आवश्यक असलेली योजनेची अंदाजपत्रक, मोजमापे, साहित्य चाचणी अहवाल, पाईप तपासणी अहवाल, क्युब टेस्ट, जलदाब चाचणी, ग्रामपंचायतीचे पत्रव्यवहार, तसेच संकल्पन मंजुरी अहवाल यासह इतर कागदपत्रे अद्याप उपलब्ध न झाल्याने चौकशी प्रक्रिया थांबलेली आहे.
कार्यकारी अभियंता पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे की, चौकशीसाठी नेमण्यात आलेले उपविभागीय अभियंता एम. एच. कुमठे हे तपासणीच्या वेळी उपस्थित नव्हते आणि त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे त्यांनी संबंधितांना तात्काळ चाचणी खडडे घेण्याचे, आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचे आणि चौकशीसाठी सहकार्य करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, हे पत्र अधीक्षक अभियंता, म.जी.प्रा. मंडळ, लातूर यांनाही माहितीस्तव पाठविण्यात आले असून, संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे चौकशीमध्ये होत असलेल्या विलंबावर लातूर विभागाने नाराजी व्यक्त केली आहे.




