ब्रेकिंगमहाराष्ट्र
चिखलातून २ किमी पायपीट, सौर कंदिलाच्या उजेडात अभ्यास; शेतकऱ्याच्या लेकीची दहावीत ९४.२० टक्क्यांची झेप
प्रशासकीय दुर्लक्षावरही उमटवला यशाचा ठसा; वैष्णवी बाडगुडेचे सर्वत्र कौतुक

0
7
6
4
8
6
चिखलातून २ किमी पायपीट, सौर कंदिलाच्या उजेडात अभ्यास; शेतकऱ्याच्या लेकीची दहावीत ९४.२० टक्क्यांची झेप
प्रशासकीय दुर्लक्षावरही उमटवला यशाचा ठसा; वैष्णवी बाडगुडेचे सर्वत्र कौतुक
तुळजापूर : अभावातही स्वभाव न बदलता कष्टाची कास धरली की यश कसं पायाशी लोळण घेतं, याचंच मूर्तिमंत उदाहरण बार्शी तालुक्यातील शेळगाव (आर) येथील वैष्णवी मोहन बाडगुडे हिने घालून दिलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या दहावीच्या निकालात वैष्णवीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तब्बल ९४.२० टक्के गुण मिळवून ग्रामीण भागासह संपूर्ण जिल्ह्याचे नाव सुवर्णाक्षरात कोरले आहे.वैष्णवीचे कुटुंब अतिशय हलाखीच्या परिस्थितीत आपला उदरनिर्वाह करत आहे.

शेळगाव (आर) हे गाव सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले असल्याने भौगोलिक अडचणींचा सामना येथील नागरिकांना कायम करावा लागतो. वैष्णवीचे वडील मोहन बाडगुडे यांची शेती शेजारच्या धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील वाणेवाडी शिवारात आहे.

घरापासून शेतापर्यंत जाण्यासाठी पक्क्या रस्त्याचा साधा मागमूसही नसताना, पावसाळ्यात चिखल तुडवत आणि उन्हाळ्यात रणरणत्या उन्हात वैष्णवीला दररोज साधारण दोन किलोमीटर अंतर पायपीट करत शेतात जावे लागत होते. ही केवळ पायपीट नव्हती, तर तिच्या स्वप्नांच्या दिशेने सुरू असलेला संघर्षमय प्रवास होता.
शेतात वास्तव्यास असताना वीज आणि मूलभूत सोयीसुविधांची मोठी वानवा होती. मात्र, परिस्थितीच्या या कठीण आव्हानांपुढे न खचता वैष्णवीने जिद्दीने अभ्यास सुरू ठेवला. घरातील कामे आणि शेतीच्या कामात आई-वडिलांना मदत करत असतानाच तिने अभ्यासाचे योग्य नियोजन केले.
दिवसभर कष्ट केल्यानंतरही रात्री गाव शांत झाल्यावर वैष्णवी सौर कंदील आणि बॅटरीच्या मंद उजेडात तासन्तास अभ्यास करत होती. तिच्या डोळ्यांतील जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर तिने अंधारालाही हरवले आणि यशाला गवसणी घातली.
वैष्णवीच्या यशामुळे परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, शेळगाव ते वाणेवाडी या भागात रस्त्याची सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना व शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, वैष्णवीच्या यशाने प्रशासनाच्या दुर्लक्षावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
0
7
6
4
8
6



