ब्रेकिंगमहाराष्ट्र
परंड्यासह उमरग्याचे दोन अपक्ष राणाजगजितसिंह पाटील यांच्या गोटात; तानाजी सावंतांना मोठा धक्का
परंड्यासह उमरग्याचे दोन अपक्ष राणाजगजितसिंह पाटील यांच्या गोटात; तानाजी सावंतांना मोठा धक्का

0
7
6
4
9
7
धाराशिव : जिल्हा परिषदेतील सत्तासंघर्षात राज्याचे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या राजकारणाला त्यांच्या बालेकिल्ल्यातच जबर धक्का बसला आहे. परंडा आणि उमरगा तालुक्यातील दोन अपक्ष सदस्यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत महायुतीला पाठिंबा जाहीर केल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत.लोकसभा निवडणुकीदरम्यान महायुतीच्या धर्माला हरताळ फासत सावंतांनी पडद्यामागून विरोधकांशी हातमिळवणी केल्याचा आरोप त्यांच्या पक्षातीलच निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी केला आहे. ठाकरे गटाच्या उमेदवाराला मदत करून महायुतीच्या उमेदवाराचा पराभव घडवून आणण्याचा प्रयत्न झाल्याचा खळबळजनक दावा नव्याने निवडून आलेल्या सदस्यांनी केला आहे. “हाफकिन” आणि “खेकडा”सारख्या वादग्रस्त विधानांमुळे जिल्ह्याची नाचक्की झाल्याचा ठपका ठेवत, सावंतांचे पुतणे व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनीही काकांच्या नेतृत्वाला रामराम ठोकत अर्चनाताई पाटील यांच्या अध्यक्षपदासाठी महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे.परंडा तालुक्यातील लोणी गटाच्या अपक्ष सदस्य राणी रेवनाथ ढोरे यांनी तानाजी सावंतांची साथ सोडून राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली जाण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच उमरगा तालुक्यातील तुरोरी गटाच्या अर्चना युवराज जाधव आणि आलूर गटाचे आप्पासाहेब मल्लिनाथ पाटील यांनीही महायुतीला पाठिंबा दिला आहे.सध्या महायुतीकडे भाजप १९, राष्ट्रवादी ६, शिवसेना (शिंदे गट) ७ आणि अपक्ष ४ असे एकूण ३६ सदस्यांचे स्पष्ट बहुमत आहे. हे सर्व सदस्य सध्या सहलीवर असून, सावंतांच्या छुप्या राजकारणाबाबतची नाराजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडण्यात आल्याचे समजते. या राजकीय घडामोडींमुळे जिल्ह्यात सावंतांचे वर्चस्व हादरले असून राणाजगजितसिंह पाटलांची पकड अधिक मजबूत झाली आहे.


0
7
6
4
9
7



