पत्नीचे परपुरुषाशी व्हॉट्सॲप कॉल कारनामुळे तरुणाची आत्महत्या; तामलवाडी पोलिसांची तत्पर कारवाई
पत्नीचे परपुरुषाशी व्हॉट्सॲप कॉल कारनामुळे तरुणाची आत्महत्या; तामलवाडी पोलिसांची तत्पर कारवाई
तुळजापूर : प्रतिनिधी
पत्नीचे परपुरुषाशी व्हॉट्सॲप कॉलवरून सुरू असलेले बोलणे आणि त्यावरून होत असलेल्या सततच्या वादामुळे त्रस्त झालेल्या एका तरुणाने अखेर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तुळजापूर तालुक्यातील केमवाडी शिवारात ३१ ऑक्टोबर रोजी घडली.
या प्रकरणी मृत तरुणाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून, पत्नी व तिच्या मित्राविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा तामलवाडी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी जलद गतीने तपास सुरू केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गहिनीनाथ दिगंबर पोफळे (वय २८, रा. गावडी दारफळ, ता. उत्तर सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० ते रात्री ९.०० या वेळेत केमवाडी शिवारातील गट क्र. २५३ मधील पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेनंतर मृताच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मयताची पत्नी श्वेता गहिनीनाथ पोफळे (ह.मु. तोकर वस्ती, बाळे, सोलापूर) ही अजय पवार (रा. गुळवंची, ता. उत्तर सोलापूर) या परपुरुषाशी व्हॉट्सॲप कॉलद्वारे संवाद साधत असे. याच कारणावरून ती आपल्या पतीशी नेहमी वाद घालत असून त्यांना मानसिक छळ देत होती.
पत्नी व अजय पवार यांच्या या वागणुकीला कंटाळूनच गहिनीनाथ यांनी आपले जीवन संपविले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.या फिर्यादीवरून तामलवाडी पोलिसांनी श्वेता पोफळे व अजय पवार या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
घटनेनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तामलवाडी पोलिस पथकाने घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. त्यांच्या दक्ष आणि संवेदनशील नेतृत्वामुळे प्रकरणाची न्याय्य व काटेकोर छाननी सुरू असून, अत्यल्प वेळात गुन्हा दाखल करून तातडीने तपासाला गती देण्यात आली आहे.



