“नगरसेवक बना,भ्रष्टाचार खना!”तुळजापूरात निवडणुकीचा नवा नारा!
सोशल मीडियावर गाजतोय नवा नारा: ‘नगरसेवक बना,भ्रष्टाचार खना!’
“नगरसेवक बना,भ्रष्टाचार खना!”तुळजापूरात निवडणुकीचा नवा नारा!

सोशल मीडियावर गाजतोय नवा नारा: ‘नगरसेवक बना,भ्रष्टाचार खना!’
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजाभवानी पुण्य पावन नगरीतील आगामी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. “नगरसेवक बना, भ्रष्टाचार खना” हा नारा सध्या सोशल मीडियापासून ते चौकाचौकात चर्चेचा विषय ठरत आहे. नवमतदारामध्ये पारदर्शक आणि प्रामाणिक प्रशासनाची अपेक्षा वाढली असून जुन्या अपप्रवृत्तींविरुद्ध रोष व्यक्त होत आहे.
तुळजापूर नगरपरिषदेमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक विकासकामांवरून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. रस्ते, पाणीपुरवठा,स्वच्छता,शौचालय,लघुशंकालय यांसारख्या मूलभूत सुविधांबाबत मतदारांमध्ये असंतोष आहे. काही ठिकाणी अपूर्ण कामे, तर काही ठिकाणी दर्जाहीन कामे झाल्याची तक्रार मतदार सातत्याने करत आहेत. या पार्श्वभूमीवर नव्या निवडणुकीत “स्वच्छ प्रतिमा” आणि “काम करणारा उमेदवार” ही मागणी प्रखर होत आहे.
दरम्यान, प्रमुख राजकीय पक्षांकडूनही रणनीती आखण्यात येत आहे. महाविकास आघाडी,महायुती, मनसे तसेच अपक्ष गट या सर्वांनी गुप्त बैठकांना सुरुवात केली आहे. प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर इच्छुक नगरसेवकांनी आपले प्रचार यंत्रणा सक्रिय केली आहे. काही ठिकाणी तर बॅनर, पोस्टर आणि सोशल मीडियाद्वारे “माझं शहर, माझा विकास” अशा घोषवाक्यांद्वारे जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे.
निवडणुकीच्या निमित्ताने अनेक तरुण आणि महिला उमेदवार देखील रिंगणात उतरू लागले आहेत. “आम्ही विकासाच्या राजकारणासाठी आलो आहोत, भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणार आहोत” असे मत अनेक नवउमेदवारांनी व्यक्त केले आहे. नागरिक मात्र यंदा जागरूक झाले असून वचनांपेक्षा कृतीकडे अधिक लक्ष देणार असल्याचे सांगत आहेत.
राजकीय विश्लेषकांच्या मते, यंदाची निवडणूक “जनतेचा विश्वास विरुद्ध जुनी गटबाजी” अशी ठरण्याची शक्यता आहे. शहराच्या विकासाचा आराखडा, स्वच्छ प्रशासन, आणि जबाबदार प्रतिनिधी निवडण्याची हीच योग्य वेळ असल्याचे मत व्यक्त होत आहे.
“नगरसेवक बना, भ्रष्टाचार खना” हा नारा तुळजापूरच्या जनतेचा नवसंकेत ठरू शकतो, असा विश्वास अनेक समाजघटकांनी व्यक्त केला आहे. यामुळे येत्या काही दिवसांत तुळजापूरचे राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.



