ब्रेकिंगमहाराष्ट्र
तुळजापूर तालुक्यात ६४.६७ टक्के मतदान; शांततेत पार पडली निवडणूक प्रक्रिया
तुळजापूर तालुक्यात ६४.६७ टक्के मतदान; शांततेत पार पडली निवडणूक प्रक्रिया

0
7
6
4
8
6
तुळजापूर तालुक्यात ६४.६७ टक्के मतदान; शांततेत पार पडली निवडणूक प्रक्रिया
तुळजापूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तुळजापूर तालुक्यात शनिवारी (दि. ७ फेब्रुवारी २०२६) मतदान शांततेत आणि सुरळीत पार पडले. सकाळ पासूनच मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत होते. तालुक्यातील एकूण १,९४,८९७ मतदारांपैकी मोठ्या संख्येने नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.प्राप्त माहितीनुसार, यावेळी एकूण ६४.६७ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. त्यामध्ये पुरुष मतदारांपैकी ६६,८९० जणांनी तर महिला मतदारांपैकी ५९,१४४ जणांनी मतदान केले. सकाळी मतदान केंद्रांवर रांगा लागल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. विशेषतः ग्रामीण भागात महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग लक्षणीय होता.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय आणि शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या होत्या. जिल्हा व तालुका प्रशासनासह पोलीस प्रशासनाने संवेदनशील ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता. मतदान केंद्र परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त, गस्त पथके तसेच द्रुत प्रतिसाद पथके तैनात करण्यात आली होती. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही आणि संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पडली.राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मतदारांची गैरसोय होऊ नये म्हणून पाणी, सावली तसेच रांगेचे नियोजन करण्यात आले होते. काही ठिकाणी सकाळी मतदानाचा वेग मंद होता, मात्र दुपारनंतर आणि सायंकाळच्या सत्रात मतदानाला वेग आल्याचे दिसून आले.निवडणूक यंत्रणा, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावत संपूर्ण प्रक्रिया यशस्वी केली. एकूणच तुळजापूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे मतदान शांततेत, शिस्तबद्ध आणि कायद्याच्या चौकटीत पार पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. आता सर्वांचे लक्ष दि.९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी आणि निकालाकडे लागले आहे.
0
7
6
4
8
6



