ब्रेकिंगमहाराष्ट्र
तुळजापूर : सर्व्हिस रोडवर अतिक्रमणांचा विळखा कायम; रुग्णालयासमोरही अडथळे, प्रशासनासमोर मोठे आव्हान
अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असतानाही लातूर रोडवरील स्थिती जैसे थे; नागरिकांमध्ये संताप

0
7
6
4
8
6
तुळजापूर : सर्व्हिस रोडवर अतिक्रमणांचा विळखा कायम; रुग्णालयासमोरही अडथळे, प्रशासनासमोर मोठे आव्हान
अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असतानाही लातूर रोडवरील स्थिती जैसे थे; नागरिकांमध्ये संताप
तुळजापूर, : ज्ञानेश्वर गवळी
शहरातील प्रमुख मार्गांवरील अतिक्रमणांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून, त्याचा थेट परिणाम वाहतूक व्यवस्था, शहराचा विकास आणि नागरिकांच्या सुरक्षेवर होत आहे. विशेषतः लातूर रोडवरील उपजिल्हा रुग्णालयासमोरील सर्व्हिस रोड तसेच धाराशिव रोड ते नळदुर्ग रोड या मार्गांवरील अतिक्रमणांनी परिस्थिती अधिकच बिकट केली आहे.
शासनाच्या मालकीच्या सर्व्हिस रोडवर गेल्या काही वर्षांत हॉटेल व्यवसायासह विविध व्यावसायिकांनी पत्र्याचे डबे उभे करून अतिक्रमण केल्याचे चित्र आहे. इतकेच नव्हे, तर काही ठिकाणी वीज जोडणी देण्यात आल्याने अतिक्रमणधारकांचा आत्मविश्वास अधिकच वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.दरम्यान, नगरपालिकेकडून दि. २३ एप्रिलपासून अतिक्रम हटाव मोहीम सुरू करण्यात आली असली, तरी लातूर रोडवरील सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणांकडे अद्याप दुर्लक्ष होत असल्याची टीका होत आहे. त्यामुळे “मोहीम फक्त नावालाच का?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

शहराचा विकास आराखडा तयार करताना या अतिक्रमणांचा विचार न झाल्यामुळे पार्किंग, सार्वजनिक शौचालये आणि सर्व्हिस रोड यांसारख्या मूलभूत सुविधा बाधित झाल्या आहेत. याचा फटका रुग्ण, भाविक आणि सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या तुळजापूरच्या प्रतिमेलाही यामुळे धक्का बसत असल्याची भावना व्यक्त होत आहे.वाहतुकीच्या समस्याही दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. सर्व्हिस रोड अतिक्रमणामुळे वापरात नसल्याने वाहनांना मुख्य रस्त्यावरच चुकीच्या बाजूने प्रवास करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर गतवर्षी १० डिसेंबर रोजी धाराशिव बायपासवरील डी-मार्टसमोर झालेल्या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. अशा घटनांची पुनरावृत्ती होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.काही स्थानिकांकडून जाणूनबुजून सर्व्हिस रोडचे काम थांबवण्यात आल्याची चर्चा असून, शासनाची कोट्यवधींची जमीन खासगी ताब्यात गेल्याचे आरोपही होत आहेत. या प्रकरणामागे स्थानिक राजकीय समीकरणे असल्याचेही बोलले जात आहे.जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी तातडीने हस्तक्षेप करून तुळजापूर शहरातील सर्व अतिक्रमणे हटवून सर्व्हिस रोड व इतर सार्वजनिक सुविधा मोकळ्या करून द्याव्यात, अशी ठाम मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा शहराचा नियोजित विकास ठप्प होऊन धार्मिक पर्यटनावरही त्याचा गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.दरम्यान, अतिक्रमण हटाव मोहिमेला गती देत लातूर रोडसह सर्वच सर्व्हिस रोड अतिक्रमणमुक्त करण्याची गरज असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले आहे.तुळजापूर जुने बस स्थानक व नविन बस स्थानक ,मलबा हॉस्पिटल परिसरपूर्ण ब्लॉक केलेला आहे तसेच धाराशिव रोड बीएसएनएल ऑफिस परिसर अतिक्रमणे व्यापलेला आहे.
————————
नगरपरिषद कडून करण्यात आलेल्या या अतिक्रमण मोहिमेचे स्वागत असून शहरातील सर्व शासकीय कार्यालयाच्या आजूबाजूची अतिक्रमण देखील काढणे गरजेचे असून त्यामुळे मुख्याधिकारी नगरपरिषद यांनी शहरातील लातूर रोड, धाराशीव रोड, नळदुर्ग रोड, वरील अतिक्रमणे ही तात्काळ काढण्याची गरज आहे .
अमोल कुतवळ ,नगरसेवक तथा
काँग्रेस गटनेते, तुळजापूर
0
7
6
4
8
6




