नांदेडच्या व्यापाऱ्याची तुळजापूर पोलिसांत तक्रार; बनावट मुखत्यारपत्राचा पर्दाफाश ;खडकीत बनावट कागदपत्रांवरून जमीन बळकावण्याचा प्रयत्न उघड
जमीन बळकावण्यासाठी दिल्ली–सोलापूर–धाराशिव कनेक्शन उघडकीस
नांदेडच्या व्यापाऱ्याची तुळजापूर पोलिसांत तक्रार; बनावट मुखत्यारपत्राचा पर्दाफाश !
खडकीत बनावट कागदपत्रांवरून जमीन बळकावण्याचा प्रयत्न उघड
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्यातील खडकी परिसरातील येथील गट क्रमांक ४१,क्षेत्र ०२ हे ८५ आर इतकी कुटुंबाची मालकीची जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे बळकावण्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी नांदेड येथील व्यापारी गिरीष दिक्षीत यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत दिल्ली, सोलापूर व धाराशिव येथील चार जणांसह दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यावरही संगनमताचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारदार गिरीष दिक्षीत हे नांदेडमधील हडको परिसरात वास्तव्यास असुन व्यापार व्यवसाय करतात. त्यांच्या कुटुंबाच्या नावावर तुळजापूर तालुक्यातील खडकी शिवारातील गट नंबर ४१ मधील जमीन असून ती त्यांच्या वडिलांच्या—अशोक गणपतराव दिक्षीत यांच्या नावावर महसूल नोंदवहीत आहे. त्यांचे वडील हे सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी असून अर्धांगवायू व इतर आजारांमुळे हालचाल करण्यास असमर्थ आहेत. त्यामुळे कुटुंबाची जमीन मजुरामार्फत कसली जात असल्याचे दिक्षीत यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
या परिस्थितीचा फायदा घेत अजय कुमार यादव (रा. दिल्ली), झापु लक्ष्मण राठोड (रा. खडकी), अय्यूब राजन पटेल (रा. बोरामणी) व संदीप नवनाथ पाटील (रा. मुळेगाव तांडा) यांनी एकमेकांशी संगनमत करून दिक्षीत कुटुंबाची जमीन बळकावण्याचा कट रचला असल्याचा आरोप आहे. दिक्षीत यांच्या आजी यमुनाबाई दिक्षीत या २००५ सालीच मृत्युमुखी पडल्या असतानाही त्यांच्या नावावरून बनावट आधार व इतर कागदपत्रे तयार करून ३० जून २०२५ रोजी अजय कुमार यादव यांच्या नावावर खोटे कुलमुखत्यारपत्र बनवण्यात आले, असे तक्रारीत नमूद आहे.
या बनावट मुखत्यारपत्राच्या आधारे ८ सप्टेंबर २०२५ रोजी दुय्यम निबंधक कार्यालय, तुळजापूर येथे दस्त क्रमांक ५४२१/२०२५ असा संशयास्पद खरेदीखताचा व्यवहार नोंदवण्यात आला. दरम्यान, फेरफार नोंदीसाठी महसूल विभागाकडे प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती मिळताच दिक्षीत यांनी तलाठी कार्यालयात आक्षेप नोंदवला आणि कागदपत्रांची तपासणी केली असता संपूर्ण व्यवहार बनावट असल्याचे स्पष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणी संबंधित चारही आरोपी, तसेच नोंदणी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी संगनमत करून फसवणूक केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. घटनेची सखोल चौकशी करून गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी दिक्षीत यांनी तुळजापूर पोलिसांकडे केली आहे.

दुय्यम निबंधक श्रेणी -१ कार्यालय,तुळजापूर
खडकी परिसरातील गट क्र. ४१ या जमीन व्यवहारासंबंधी नोंदणी कार्यालयात सादर करण्यात आलेल्या दस्तांची प्राथमिक छाननी करताना काही विसंगती आढळून आल्या. संबंधित कागदपत्रे तत्काळ तपासणीसाठी प्रेषित करण्यात आली आहेत. तपासणी अहवाल प्राप्त होताच कायद्यानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. नोंदणी कार्यालय कोणत्याही प्रकारच्या गैरव्यवहाराला पाठबळ देत नाही आणि सर्व व्यवहार पारदर्शक व नियमबद्ध पद्धतीने करण्यास कटिबद्ध आहे.




