Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या काचोळे कुटुंबाला दिलासा; शासनाकडून १० लाखांची मदत मंजूर

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची दखल; धाराशिव जिल्ह्यातील पाच कुटुंबांना प्रत्येकी १० लाखांचे अर्थसहाय्य

0 7 6 4 8 6

मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या काचोळे कुटुंबाला दिलासा; शासनाकडून १० लाखांची मदत मंजूर

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची दखल; धाराशिव जिल्ह्यातील पाच कुटुंबांना प्रत्येकी १० लाखांचे अर्थसहाय्य

तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी

मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आत्महत्या केलेल्या धाराशिव जिल्ह्यातील पाच कुटुंबांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी १० लाख रुपये प्रमाणे एकूण ५० लाख रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले असून, त्यामध्ये तुळजापूर शहरातील मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या दिगंबर वसंत काचोळे यांच्या कुटुंबाचाही समावेश आहे.

मुख्यमंत्री सचिवालयाचे कक्ष अधिकारी तथा सहकक्ष प्रमुख शरद घावटे यांनी गुरुवारी दि.४ जून २०२६ रोजी जिल्हाधिकारी धाराशिव यांना याबाबत अधिकृत पत्र जारी केले. मराठा समाजास आरक्षण मिळावे तसेच आरक्षण आंदोलनादरम्यान आत्महत्या केलेल्या कुटुंबियांना मदत मिळावी, या मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी केलेल्या आंदोलनाची शासनाने दखल घेत ही मदत मंजूर केली आहे.या मदतीस पात्र ठरलेल्या कुटुंबांमध्ये सुरज अरुण जगदाळे (डोकेवाडी, भूम), दिगंबर वसंत काचोळे (शुक्रवार पेठ, तुळजापूर), मोहन अंबादास बेडकाळे (मुरुम, उमरगा), परमेश्वर राजेंद्र मिसाळ (कोंबडवाडी, धाराशिव) आणि प्रशांत गोविंदराव पवार (दाबका, उमरगा) यांचा समावेश आहे.

तुळजापूर येथील दिगंबर वसंत काचोळे यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघत नसल्याने आणि समाजाच्या भवितव्याची चिंता मनात बाळगून टोकाचे पाऊल उचलल्याची घटना राज्यभर चर्चेचा विषय ठरली होती. त्यांच्या कुटुंबाला शासनाची मदत मिळावी यासाठी अनेकांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
विशेष म्हणजे, तुळजापूर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सूर्यवंशी, उद्योजक तेजस बोबडे, पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, पोलीस अधिकारी श्रीनिवास आरदवाड तसेच विशाल छत्रे यांनी या प्रकरणी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

जिल्हा प्रशासनाकडे निधी वर्ग करण्यात आला असून, संबंधित कुटुंबियांची कायदेशीर पडताळणी पूर्ण करून अर्थसहाय्याचे वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच मदत वितरित झाल्यानंतर त्याचा अहवाल मुख्यमंत्री सचिवालयाकडे सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
मराठा आंदोलनातील बलिदानाला शासनाची दखल मराठा आरक्षणासाठी झटणाऱ्या आणि समाजाच्या प्रश्नांसाठी जीवन अर्पण करणाऱ्या कुटुंबियांना मिळालेली ही मदत म्हणजे त्यांच्या वेदनांवरील फुंकर असल्याची भावना समाजबांधवांकडून व्यक्त होत आहे. तुळजापूरसह संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे