तुळजापूर शहर कचऱ्यात गुदमरतेय;महिन्याला २४ लाख खर्चूनही घाणीचे साम्राज्य कायम – खतनिर्मिती मशीन धूळ खात पडले; मनसेचा नगर परिषदेला इशारा
तुळजापूर शहर कचऱ्यात गुदमरतेय!
तुळजापूर शहर कचऱ्यात गुदमरतेय!
महिन्याला २४ लाख खर्चूनही घाणीचे साम्राज्य कायम – खतनिर्मिती मशीन धूळ खात पडले; मनसेचा नगर परिषदेला इशारा
तुळजापूर : प्रतिनिधी
तुळजापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून कचरा आणि घाणीचे साम्राज्य पसरले असून, शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि वसाहती परिसरात कचऱ्याचे ढिग साचले आहेत. कचऱ्यातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले असून, आरोग्याच्या समस्या गंभीर बनल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या अस्वच्छतेबद्दल नगर परिषदेच्या निष्काळजीपणावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
मनसे शहराध्यक्ष श्री. धर्मराज सावंत यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या निवेदनात प्रशासनावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. “स्वच्छतेसाठी महिन्याचे तब्बल २४ लाख रुपये खर्च केले जात असतानाही शहरात घाणीचे साम्राज्य कसे?” असा तीव्र प्रश्न त्यांनी विचारला आहे.
◾ “स्वच्छता निधीचा गैरवापर?
मनसेने आरोप केला आहे की, नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाकडून दररोज सुमारे एक लाख रुपये आणि महिन्याला जवळपास २४ लाख रुपये खर्च होत असतानाही प्रत्यक्षात शहराची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. निधी नेमका कशावर आणि कुठे खर्च होत आहे, याचा लेखी खुलासा नागरिकांसमोर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

◾खतनिर्मिती मशीन धूळ खात पडले!
शहरात दररोज सुमारे ९ टन कचरा संकलित होतो. त्यातील ४ टन कचऱ्याचे विलगीकरण आणि प्रक्रिया करणे अपेक्षित असताना, हे काम पूर्णपणे ठप्प आहे. खतनिर्मितीचे मशीन गेल्या अनेक महिन्यांपासून निष्क्रिय अवस्थेत पडून आहे. परिणामी, शहरातील कचरा प्रक्रिया केंद्राचा बोजवारा उडाला असून, तुळजापूरची वाटचाल ‘कचरा नगरी’कडे होत असल्याची टीका मनसेने केली आहे.
◾नागरिकांच्या आरोग्याला धोका
कचऱ्याचे ढिग, तुंबलेले नाले आणि नाकावर रुमाल बांधून फिरावे लागणारी परिस्थिती… अशा वातावरणामुळे शहरात दुर्गंधी आणि साथीचे रोग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. या परिस्थितीस नगर परिषद प्रशासन जबाबदार असल्याचे मनसेचे मत आहे.
◾मनसेच्या प्रमुख मागण्या
पुढील ४८ तासांत सर्व प्रमुख ठिकाणांवरील साचलेला कचरा तातडीने हटवावा. पुढील ७ दिवसांत कचरा विलगीकरण आणि प्रक्रिया केंद्र सुरू करून नियमित स्वच्छता मोहीम राबवावी.स्वच्छता निधीचा सविस्तर आर्थिक अहवाल नागरिकांसमोर जाहीर करावा.

◾आंदोलनाचा इशारा
या मागण्या तातडीने मान्य केल्या नाहीत, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.या निवेदनावर धर्मराज सावंत, महेश जाधव ,मयूर गाढवे ,अविनाश पवार, विशाल माने आणि समीर शेख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.




