ब्रेकिंगमहाराष्ट्र
आळणी पाटीजवळ गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर वाहतूक उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली कारवाई; पाच गोवंशीय जनावरे व वाहन जप्त

0
7
6
4
8
7
आळणी पाटीजवळ गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर वाहतूक उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी
स्थानिक गुन्हे शाखेने गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी होणारी बेकायदेशीर वाहतूक उघडकीस आणत मोठी कारवाई केली आहे. दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखा धाराशिवचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार हे आपल्या स्टाफसह पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. यावेळी येडशी ते धाराशिव रोडवर आळणी पाटीजवळ एका संशयित वाहनामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक होत असल्याचा संशय पोलिसांना आला.
पोलिसांनी सदर वाहन चालकास गाडी थांबवण्याचा इशारा दिला असता चालकाने गाडी रस्त्याच्या बाजूला थांबवली. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये अत्यंत दाटीवाटीने गोवंशीय जनावरे भरलेली असल्याचे दिसून आले. या जनावरांना कुठून आणले व कशासाठी नेले जात आहे, याबाबत विचारणा केली असता वाहन चालक समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. त्यानंतर सदर वाहन तात्काळ पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण येथे नेण्यात आले.पोलीस ठाण्यात दोन पंचांच्या समक्ष तपासणी केली असता वाहनामध्ये पाच गोवंशीय जनावरे आढळून आली. वाहनासह एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे ९ लाख १५ हजार रुपये इतकी असल्याचे निष्पन्न झाले. या गाईंना अत्यंत दाटीवाटीने, हालचालीसाठीही जागा न देता, त्रासदायक पद्धतीने वाहतूक करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले.या प्रकरणी पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण येथे गुन्हा नोंदणी क्रमांक ३४/२०२६ अन्वये प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११ (१) (D) (E) (H) तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ चे कलम ५(अ) (१), ९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ/११२२ शिंदे, पोलीस स्टेशन धाराशिव ग्रामीण हे करीत आहेत.ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस हवालदार दत्तात्रय राठोड, दयानंद गादेकर, बळीराम शिंदे, पोलीस नाईक अशोक ढगारे, पोलीस अंमलदार प्रकाश बोईनवाड तसेच पोलीस स्टेशन धाराशिव ग्रामीणचे पोलीस हवालदार अविनाश शिंदे व विशाल खोसे यांचा सहभाग होता.
स्थानिक गुन्हे शाखेच्या या तत्पर आणि प्रभावी कारवाईमुळे बेकायदेशीर जनावर वाहतुकीविरोधात पोलिसांचा कडक संदेश गेला आहे.
0
7
6
4
8
7



